रानीपेट जिल्ह्यातील द्रमुकच्या एका पदाधिकाऱ्यावर राजकारण्यांसाठी मुलींचे ग्रोमिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर युवा शाखेच्या उपसंघटक पदावरून आर. देवसेयाल या पदाधिकाऱ्याला हटवण्यात आले. देवसेयाल याच्यावर लैंगिक शोषण, जबरदस्तीने लग्न करणे आणि अनेक तरुणींचे शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पक्षाने त्याला निलंबित केले आहे. मंगळवारी तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी देवसेयाल याला त्याच्या पदावरून काढून टाकल्याची घोषणा केली. या प्रकरणामुळे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत, हे आरोप गंभीर असल्याचे म्हटले आहे. तीन दिवसांत तमिळनाडू पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागितल्यानंतर लगेचच देवसेयाल याला निलंबित करण्यात आले आहे.

महिलेचे आरोप काय?

अराक्कोनम येथील एका २० वर्षीय महिलेने हा आरोप केला आहे. देवसेयाल याने या तरुणीला फसवून तिला लग्न करण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर देवसेयाल याचे आधीच लग्न झाल्याचे या तरुणीला कळले. त्याबाबत तिने पोलिसांत तक्रारही केली आहे. त्यामध्ये तिने असा दावा केला आहे की, या पीडित मुलीचे आधीच एक लग्न झाले होते आणि तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच देवसेयाल हा तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने तिला दुसऱ्यांदा त्याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. तिची परिस्थिती माहीत असताना त्याने तिला धमकावले आणि ३१ जानेवारी २०२५ ला दुसरे लग्न करायला भाग पाडले. यादरम्यान देवसेयाल याने तिला घटस्फोट लवकरात लवकर मिळावा यासाठी राजकीय संपर्कांचा वापर करून तिला मदत करू, असे आश्वासन दिल्याचे पीडित महिलेने सांगितले.

या महिलेने पुढे असाही आरोप केला की, तिला लग्नानंतर समजले की, देवसेयाल याची डी. कनिमोझी नावाची एक पत्नी आहे. त्याच्या पत्नीला देवसेयालच्या लग्नाबाबत केवळ माहितीच नव्हती, तर तिनं त्याला पाठिंबाही दिला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर तिचा प्रचंड शारीरिक छळ केला गेला. इतर प्रभावशाली द्रमुक सदस्यांची लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिनं त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवावेत यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. तिने असाही आरोप केला की, देवसेयालने इतर तरुणींनाही जाळ्यात ओढत त्यांना राजकारणी लोकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. “तरुण मुलींना जाळ्यात ओढून राजकारण्यांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणं हे देवसेयालचं काम आहे. त्याच्यावर कधीही कारवाई झाली नाही. मी तक्रार केली तेव्हा त्यानं माझे तुकडे करणार, अशी धमकी दिली होती. त्यानं माझा छळ करीत इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं. मला घरातून बाहेर पडता आलं नाही आणि मला परीक्षाही देता आल्या नाहीत”, असे या पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांची कारवाई काय?

महिलेच्या तक्रारीनंतर, अरक्कोनम ऑल वूमन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत देवसेयाल आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये कलम २९६(ब)-सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द उच्चारणे, कलम ७५(२)-लैंगिक संबंधांची मागणी करणे, कलम ८२(२)-दोन विवाह, कलम ३५१- धमकी देणे यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, आरोपांचे स्वरूप आणि सार्वजनिक हितसंबंध यांमुळे प्रकरण गांभीर्याने हाताळलं जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपींची अटकपूर्व जामिनाची मागणी

दरम्यान, ३७ वर्षीय देवसेयाल आणि ३५ वर्षीय पत्नी कनिमोझी यांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आरोपींनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हा खटला राजकीयदृष्ट्या प्रतिस्पर्ध्यांनी रचलेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कथित लग्न जर जानेवारीमध्ये झाले होते, तर मे महिन्यात एफआयआर का दाखल करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अण्णाद्रमुकची निदर्शनं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने सत्ताधारी द्रमुक सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी देवसेयाल याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी पक्ष त्यांच्यातल्या चुकीच्या लोकांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अण्णाद्रमुकचे आमदार एस.रवी यांनी पीडितेच्या वतीने हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच तिच्या आधीच्या अनेक तक्रारींकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.