गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातले महायुती सरकार त्यांच्याच मित्रपक्षांतील नेत्यांमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. कोणाचे विधान व्हायरल झाले, तर कोणाचा व्हिडीओ. मात्र, त्या कोणावरही सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. हाच मुद्दा हाताशी घेत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपाच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यास त्यांच्या हातात काही अधिकार आहेत की नाही, असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरूनच सरकारला धारेवर धरण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी जनआक्रोश आंदोलन केले. महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि वाचाळ मंत्र्यांविरोधात आक्रोश करीत शिवसैनिकांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या. भ्रष्टाचारी मंत्री आणि महायुती सरकारच्या विरोधातील हा आक्रोश महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
युतीच्या मित्रपक्षांचे प्रताप
११ जुलै रोजी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली बॅग दिसत असल्याचा आरोप आहे. मात्र, व्हिडीओ आपल्या शयनकक्षातील असल्याचे मान्य करीत संजय शिरसाट यांनी बॅगेत पैसे नसून कपडे असल्याचा दावा केला. काही दिवसांनी गृह राज्यमंत्री व शिवसेनेचे योगेश कदम यांच्यावर बेकायदा वाळू व्यापार आणि मुंबईत डान्स बार चालवण्याचे आरोप झाले. विधान परिषदेच्या अधिवेशनात शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अनिल परब यांनी आरोप केला की, कदम यांच्या आईच्या नावावर हा बार असून, ते कायद्याचे उल्लंघन करून हा डान्स बार चालवत आहेत. त्याशिवाय शिवसेना (शिंदे गट)चे मंत्री संजय राठोड आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यादेखील खात्यातील भरती आणि बदली प्रक्रियेसंदर्भातील वाद निर्माण झाला. दरम्यान, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे विधानसभा अधिवेशनात ऑनलाइन पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरही विरोधकांनी सडकून टीका केली. त्यानंतर कारवाई म्हणून त्यांच्याकडून कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. संजय शिरसाट यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्या हॉटेलविक्रीच्या निविदेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ नफा कमावतात आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस या वाहन सेवेकरिता राज्य सरकारने ॲप तयार करणार असल्याचे सांगितले. परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेबाबत चालकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. मुंबईत रॅपिडो कंपनीच्या बेकायदेशीर बाईट टॅक्सी चालवल्याचा पर्दाफाश सरनाईकांनी केला होता. मात्र काही दिवसांनी त्याच ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व प्रताप सरनाईक फाउंडेशनने ‘प्रो गोविंदा लीग २०२५’ साठी घेतले. हे उघडकीस आल्यावर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
दरम्यान, या जनआक्रोश आंदोलनादरम्यान शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत म्हटले, “मित्रपक्षांच्या कारवायांमुळे त्यांना बदनामी सहन करावी लागत आहे. किती दिवस ते आपली प्रतिमा मलीन होताना पाहत बसणार. फडणवीस हे आता असहाय या शब्दासाठी समानार्थी ठरले आहेत.” विरोधकांनी या मुद्द्यावर आंदोलन सुरू केले असून, सोमवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा आरोप केला. “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे’ चर्चा घेतली होती. आता आपण सर्व विरोधी पक्षांनी मिळून ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ घ्यायला हवी, असेही राऊत यांनी म्हटले. त्याशिवाय वादग्रस्त मंत्र्यांना पदावरून काढण्याची मागणी करीत ठाकरे यांनी म्हटले होते की, फडणवीस कारवाई का करीत नाहीत? सर्व संशयितांना राजीनामा द्यायला सांगा, चौकशी करा आणि ते निर्दोष ठरले, तर त्यांना पुन्हा पदावर घ्या.”
विरोधकांच्या मते, फडणवीस हे मित्रपक्षांच्या दबावाखाली राहत आहेत की केंद्राकडून कारवाई न करण्याचा दबाव आहे, असा प्रश्न आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीचे दोन दौरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटींची चर्चा होत आहे. या बैठकीत शिवसेना नेत्यांनी निर्माण केलेल्या अडचणींचाही विषय होता, असे काही सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “फडणवीस यांना सर्व वादग्रस्त मंत्र्यांवर कठोर कारवाई करायची होती; मात्र तसं झालं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षातील मंत्र्यांवर कारवाई करू नये, अशी विनंती शिंदे यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. त्याशिवाय ते त्यांच्या मंत्र्यांना चांगले वर्तन ठेवण्यास सांगतील, असेही ते म्हणाले.”
मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
२९ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त मंत्र्यांना कडक इशारा दिल्याची माहिती मिळते. “तुमच्या बेजबाबदार वक्तव्यांनी आणि वाईट वर्तनामुळे महायुतीची प्रतिमा मलीन झाली आहे. आरोप झाले, तर लगेच स्पष्टीकरण द्या आणि विकासावर लक्ष केंद्रित करा”, असे त्यांनी मंत्र्यांना बजावले. ही माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका मंत्र्याने दिली. भाजपामधील काही सूत्रांनी सांगितले, “फडणवीस यांनी मित्रपक्षांना गंभीर मुद्द्यांवर सरकार मूक गिळून राहून शकत नाही”, असे स्पष्टच सांगितले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ते कारवाई करू शकतात”, असेही सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी असेही सांगितले, “हा इशारा मित्रपक्षांना नियंत्रणात ठेवण्याची पहिली पायरी आहे. डिसेंबरमध्ये सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानंतर फडणवीस प्रत्येक मंत्र्याचा कारभार तपासतील आणि अपयशी ठरलेल्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवतील”. सत्ताधारी सरकारमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीका आणि मोहिमेबाबत महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “फडणवीस आपल्या कामातूनच विरोधकांना उत्तर देतात. जनता आमचं काम पाहून आम्हाला न्याय देईल. विरोधक ओरडू शकतात, आरोप करू शकतात; मात्र सगळ्यांना ठाऊक आहे की फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आणि विश्वासार्ह आहे.