सुहास सरदेशमुख

तेलंगणामध्ये राबविलेल्या शेतकरी व दलित उत्थानाच्या योजनांच्या आधारे महाराष्ट्रात पाय पसरण्याचे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांना आता मोठी खीळ बसण्याची शक्यता आहे. तर तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रात ‘ब’ चमू म्हणून चर्चेत असणाऱ्या ‘एमआयएम ’च्या कार्यकर्त्यांमध्येही ‘ बीआरएस’ च्या परभवामुळे चलबिचल निर्माण झाली आहे.

भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी हा दावा फेटाळला. मात्र, या निर्णयामुळे नव्याने बांधलेल्या संघटनेतील कार्यकर्ता या पराभवामुळे नाराज होईल, हे मान्य केले. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरणात तेलंगणामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीचा केसीआर यांनी मोठा प्रसार केला. शेतकरी संघटनेत काम करणारे काही कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले. मात्र, तेलंगणातील बीआरएसची सत्ता गेल्यानंतर विस्ताराची पाय आपोआपच पोटात घेतले जातील, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… भाजपच्या विजयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार ?

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये राज्य सरकार पुरेसा निधी देत नसल्याने त्यांनी ‘ आम्हाला तेलंगणा जाऊ द्या’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय कार्यशैलीवर मोठे प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील योजनांच्या कार्यशैलीचे कौतुक राज्यातील नेते करू लागले. बीड, लातूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी तेलंगणात जाऊन पाहणी केली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी नाराज असणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘केसीआर’ यांच्या कामाचे कौतुक केले होते. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पातळीवर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या अनेक नेत्यांनी ‘तेलंगणा प्रारुपा’चे तोंड भरुन कौतुक केले. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी केसीआर पाय विस्ताराला सुरुवात करतील आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. केसीआर यांनीही राज्यात काही ठिकाणी सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांवर तेलंगणातील योजनांची चित्रफित दाखविण्याचीही व्यवस्था केली होती. तेलंगणातील पराभवामुळे तो प्रभाव निर्माण करण्यास आता अडचणी येतील असे सांगण्यात येत आहे. शेती आणि शेतकरी हा मतदार व्हावा हा ‘ केसीआर’ यांचा प्रयोग ‘ मराठा- ओबीसी’ वादामुळेही प्रभावहिन ठरण्याची शक्यता होतीच. तेलंगणामधील पराभवामुळे आता ‘बीआरएस’च्या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… तेलंगणात विजय काँग्रेसचा, पण चर्चा मात्र ‘एमआयएम’ची, अकबरुद्दीन ओवैसी तब्बल ८१ हजार मतांनी विजयी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणामध्ये भाजपाने ‘ केसीआर’ यांना ‘ निजाम’ म्हटले होते. केसीआर आणि ‘ एमआयएम’यांची आघाडीही होती. तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष ‘एमआयएम ’ चमू म्हणत होता. या पक्षाचा प्रभावही आता घसरला आहे. त्यांना सात ऐवजी सहा जागांवरच समाधान मानावे लागले. ‘दोन नव्या ठिकाणी आम्ही ताकद लावली होती. पण जेवढ्या जागा होत्या तेवढ्या मिळतील. फार मोठे नुकसान झाले आहे, असे नाही. मात्र, मुस्लिम मतदार आता कॉग्रेसकडे झुकतो आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले आहे,’ असे ‘एमआयएम’ प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तिमाज जलील म्हणाले.