जळगाव : जिल्ह्यातील दिग्गज आणि एकमेकांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात एरवी नेहमी कलगीतुरा सुरू असतो. हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढामुळे वाढलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोघांमधील कटुता अधिकच तीव्र झाली आहे. एकमेकांवर आरोप करताना आपल्या कुटुंबियांनाही त्यामध्ये ओढण्यास दोघे मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून आले आहे. दोघांमधील संघर्षाला नवी धार आल्याने जिल्ह्यातील नागरिकांची मात्र करमणूक होत आहे.

जामनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अटक केल्यानंतर त्याच्या जळगाव जिल्ह्यातील संपत्तीची झाडाझडती घेतल्यावर पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले. आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याच्या शक्यतेने तपासाला गती देण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करून हे प्रकरण आणखी तापवले. मंत्री महाजन यांच्याशी प्रफुल्ल लोढा याचे पूर्वी खूप घनिष्ठ संबंध होते. नंतर दोघांमधील संबंध बिघडल्याने लोढा याने महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. याशिवाय भाजपचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.

कालांतराने मंत्री महाजन यांच्याशी बिघडलेले संबंध सुधारल्याने लोढा यास पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. वादग्रस्त लोढाला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश कसा मिळाला, असा प्रश्न करून मंत्री महाजन यांचा हनी ट्रॅपमध्ये थेट सहभाग असल्याचा आरोप नव्याने खडसे यांनी केला आहे. तेवढ्यावरच न थांबता संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी लावून धरली आहे.

दुसरीकडे, आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना मंत्री गिरीश महाजन यांनीही निखील खडसे यांच्या मृत्युचे जुने प्रकरण उकरून काढत एकनाथ खडसे यांच्या जखमेवर मीठ चोळले. एकनाथ खडसे यांची मानसिकता बिघडली आहे. प्रफुल्ल लोढा याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी ते करतात. परंतु, लोढानेही यापूर्वी निखिल खडसे याच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ती आत्महत्या आहे की हत्या, हे मी म्हणत नाही. तर ते लोढा यानेच म्हटले आहे, असा दावा मंत्री महाजन यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या मुलाच्या मृत्युचे भांडवल केले जात असल्याचे लक्षात आल्यावर खडसे चवताळले. हिंमत असेल तर संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, असे आव्हान त्यांनी महाजन यांना दिले. तसेच महाजन यांना लक्ष्य करताना त्यांनी कमावलेल्या संपत्तीवरही खडसे यांनी बोट ठेवले आहे. एका शाळा मास्तरचा मुलगा आज कोट्यवधींचा मालक आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून, असा प्रश्न खडसे यांनी विचारला आहे.