शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. यामुळेच ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यात तळमळ दिसली, असे विधान करीत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. काहीही करून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत हाच शिंदे यांचा प्रयत्न असेल.
उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत सर्वाधिक फटका हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. यातूनच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाटिप्पणी करतानाच शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली जात आहे. मेळाव्यातील भाषणानंतर शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यात मराठीबद्दल तळमळ दिसली तर उद्धव ठाकरे यांच्यात सत्तेची मळमळ दिसल्याची प्रति क्रिया व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करू नये हाच शिंदे यांचा प्रयत्न आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास एकगठ्ठा मराठी मते शिवसेना -मनसे युतीकडे हस्तांतरित होऊ शकतात. अशा वेळी एकनाथ शिंदे यांना त्याची किंमत मोजावी लागेल. शिंदे यांना हेच नको आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक आणि कायर्कर्ते सध्या शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्यास शिंदे गटात प्रवेश करणारे ठाकरे गटातच थांबण्याचे पसंत करतील. तसेच शिंदे गटात गेलेले काही माजी नगरसेवक पुन्हा ठाकरे यांच्याकडे परतू शकतात. हे सारे धोके ओळखून शिंदे यांना ठाकरे बंधू एकत्र येणे परवडणारे नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील भाजप नेत्यांमधील वाढते प्रस्थ राज्यातील भाजप नेत्यांना खुपते. यामुळेच शिंदे यांचा परस्पर काटा काढला जाणार असल्यास राज्यातील भाजप नेत्यांना ते अधिकच सोयीचे ठरेल. शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अद्यापही कायम आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे खच्चीकरण झाल्यास त्यांचे राजकीय महत्त्व कमी होऊ शकते. शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा हे केलेले आवाहनही भाजप नेत्यांना फारसे रुचलेले दिसत नाही.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील हे ओळखूनच शिंदे यांनी आधीपासूनच सावध पावले टाकली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत हे लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. शक्य झाल्यास शिंदेही लवकरच राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे बारीक लक्ष राहणार आहे.