scorecardresearch

शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची काहीही खात्री नसल्याने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच वेळ गोगावले यांच्यावर आली आहे.

शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग
शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग

हर्षद कशाळकर

मंत्रीपदासह रायगडच्या पालकमंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्या आमदार भरत गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची संधी हुकल्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद मिळण्याची त्यांची महत्वाकांक्षा अपुरी राहिली आहे. आता उदय सामंत यांच्याकडे पालकमंत्रीपद तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची काहीही खात्री नसल्याने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच वेळ त्यांच्यावर आली आहे.

अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सलग तीन वेळा निवडून आल्याने राज्यमंत्री मंडळात स्थान मिळेल अशी आशा भरत गोगावले यांना होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यातुलनेत पहिल्यांदा निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले. नऊ विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देतांनाच रायगडचे पालकमंत्रीपदही बहाल करण्यात आले. शिवसेनेचे तीन आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेत धुसफूस निर्माण झाली. या धुसफूशीच्या केंद्रस्थानी भरत गोगावले होते. यातूनच त्यांनी पुढे पालकमंत्री हटावचा नाराही दिला. शिवसेनेतील बंडाची ही सुरुवात होती. पुढे या बंडाची व्याप्ती राज्यभरात वाढल्याने महाविकास आघाडी सरकारचे पतन झाले.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये भाजपांतर्गत मतभेद दूर करण्याचे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पहिले आव्हान

राज्यात एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव आयत्यावेळी कापण्यात आले. अखेर हताश होऊन ते माघारी परतले. कधीकधी तडजोडी कराव्या लागतात, पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पहिले नाव माझेच असेल आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असे गोगावले यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रानंतर राजस्थानातही सत्तासंघर्ष; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

पालकमंत्र्यांच्या नेमणुका रखडल्याने जिल्हा विकास योजनांमधील कामांना मंजुरी देता येत नव्हती. त्यामुळे विकास कामे रखडली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यसरकारने पालकमंत्री पदाच्या नेमणुका अलीकडेच केल्या. यात रत्नागिरीच्या उदय सामंत यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे पालकमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या गोगावले यांचा मंत्रीपद नसल्याने पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला. जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा तरी गोगावले यांना स्थान मिळणार का, याची उत्सुकता रायगडकरांना असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या