मुंबईः स्वपक्षीय मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त उठाठेवीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून बदनामीमुळे यापूर्वी काही मंत्र्यांना घरी जावे लागले आहे. सत्तेची हवा डो्क्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा स्पष्ट शब्दात शिंदे यांनी सोमवारी शिवसेना मंत्री आणि आमदारांना खडसावले.

शिवसेना मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, उदय सामंत, भरत गोलावले यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांनी शिंदे यांची पुरती कोंडी झाली आहे. विधिमंडळातही विरोधक आणि भाजप- राष्ट्रवादीकडून शिंदे यांच्या पक्षाला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी आज पक्षाच्याबैठकीत स्वपक्षीय मंत्री आणि आमदारांची कानउघडणी करीत निर्वाणीचा इशारा दिला. सावकर स्मारक येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात शिंदे यांनी आपली नाराजी प्रथमच उघडपणे व्यक्त करीत मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या. गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असते.

तुमचे मंत्री,आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातोय. तुम्ही सगळी माझी माणसे आहात. आपले कुटुंब एक आहे. अशा परिस्थितीत तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे हे लक्षात ठेवा. उगाच चुकीच्या गोष्टींवर आपली ऊर्जा वाया घालवू नका. कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या पक्षाला कमी वेळात जास्त यश मिळाले आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळेच बदनामीचे डाव रचले जात आहेत. अशावेळी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या असे सांगतानाच बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावे लागले. याचे भाव ठेवा असा अप्रत्यक्ष इशाराही शिंदे यांनी दिला. आपल्या कुटुंबावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मी रागावत नाही. मी पक्ष प्रमुखासारखे वागत नाही. कार्यकर्त्यासारखे वागतो. तुम्हीही तसेच वागा. आपल्या डोक्यात सत्तेची हवा जाऊ नका. कितीही पदे मिळाली तरी कार्यकर्ता आहे असेच समजून काम करा. यापुढे कोणाचीही चूक खपवून घेतली जाणार नाही. मंत्री आणि आमदारांनीही जबाबरीने वागावे अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.