मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी मुंबईत दाखल झाला आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात आयोग राज्यातील विविध राजकीय पक्ष, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांचे गुरुवारी रात्री मुंबईत आगमन झाले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

हेही वाचा >>>हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?

आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भेटीदरम्यान आयोगाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक होणार असून त्यात राजकीय पक्षांना भूमिका मांडता येईल. राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.