विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत असली, तरी प्रचारसाहित्य तयार करणाऱ्यांना मात्र अच्छे दिन आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारऐवजी प्रमुख सहा पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने साहित्यनिर्मितीच्या कामात वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात उमेदवारीअर्ज भरण्यास अद्याप वेळ असल्याने उमेदवार किंवा पक्षांकडून प्रचार साहित्याची मागणी नोंदवायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली नाही. पण रामनवमीनंतर, म्हणजे साधारण १७ एप्रिलपासून प्रचाराची धामधूम जोरात सुरू होईल, त्या वेळी मागणी वाढेल, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. अर्थात, पक्ष व उमेदवारांचा डिजिटल प्रचारावरही भर असल्याने ही मागणी किती असेल, याचा अजून अंदाज आलेला नाही.

आणखी वाचा-मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

यंदा पंजा, कमळ, तुतारी, घड्याळ, धनुष्यबाण आणि मशाल या चिन्हांबरोबरच इतरही छोट्या पक्षांची चिन्हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. ही चिन्हे असलेले झेंडे, टोप्या, उपरणी, फेटे आदी प्रकारचे साहित्य तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यातही कापडाचे वेगवेगळे प्रकार, त्यावर वेगवेगळी नक्षी आदी प्रकारचे नावीन्य आणण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न आहे. हे प्रचारसाहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याची सध्या लगीनघाई सुरू आहे, अशी माहिती ‘मुरुडकर झेंडेवाले‘चे गिरीश मुरुडकर यांनी दिली.

मुरुडकर म्हणाले, की प्रचार साहित्यामध्ये उमेदवारासाठी पक्षाचे चिन्ह असलेले डिझायनर फेटे, पगड्या आणि उपरणे याबरोबरच पक्षाचे झेंडे, उन्हापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांना देण्यात येणारी टोपी, धातूची पदके (बॅचेस) या गोष्टींचा समावेश होतो. कमळ, हाताचा पंजा, धनुष्यबाण, घड्याळ या नेहमीच्या चिन्हांबरोबरच यंदा तुतारी आणि मशाल या नव्या चिन्हांची भर पडल्याने प्रचार साहित्याच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघ वगळता संपूर्ण राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रचार साहित्य खरेदीची बाजारपेठ अजून काही प्रमाणात थंड आहे. रामनवमीनंतर प्रचार साहित्य खरेदीला वेग येईल.

आणखी वाचा-भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार

प्रचार साहित्याचे दर

उन्हाळी टोपी – साधारण दर्जाची १० ते १५ रुपये प्रतिनग, उत्तम दर्जाची ३० ते ४० रुपये प्रतिनग

पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचे छायाचित्र असलेले उपरणे – कार्यकर्त्यांसाठी १५ ते २० रुपये प्रतिनग

उमेदवारासाठी व्हीआयपी उपरणे – २५० ते ३०० रुपये प्रतिनग

पक्षाचे झेंडे – छोट्या आकारातील दहा रुपये प्रतिनग

मोठ्या आकारातील झेंडे – १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत