Raj Narain The Man Who Challenged Indira Gandhi : दिवंगत नेते राज नारायण यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना ‘नायक’ हा शब्द फारच कमीवेळा उच्चारला जातो; पण स्वतःच्या शैलीत राजकारण करणारा नेता हे वाक्य त्यांच्या बाबतीत नेहमीच वापरलं जातं. विरोधकांवर कुरघोडी करणारे आणि सत्तेच्या समीकरणात बदल घडवणारे नेते म्हणून राज नारायण यांना ओळखलं जातं. त्यामागचं कारण म्हणजे- इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई या दोन पंतप्रधानांची सत्ता त्यांनी उलथून टाकली होती. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्याकडून पराभव झाल्यानंतर राज नारायण यांनी निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द करून त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यासाठी अयोग्य ठरवलं. यानंतर २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधानांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.
आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत, राज नारायण यांनी रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधींना पराभूत केलं आणि काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. पुढे १९७९ मध्ये, त्यांनी काँग्रेसबरोबर संगनमत करून जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना सत्तेतून खाली खेचलं आणि चौधरी चरणसिंह यांना पंतप्रधान होण्यास मदत केली. उत्तर प्रदेशातील एक माजी कुस्तीपटू, वजनदार शरीरयष्टी, जाड फ्रेमचा चष्मा आणि डोक्यावर सैल बांधलेला हिरवा रूमाल अशी राज नारायण यांची सहज ओळख होती. त्यांनी नेहमी ‘मातीशी जोडलेला नेता’ अशी प्रतिमा जपली, जी इंदिरा गांधींच्या लुटियन्स दिल्लीतल्या उच्चभ्रू पार्श्वभूमीपासून खूपच वेगळी होती.
समाजसेवेपासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास
अत्यंत साधपणाने राहणारे राज नारायण हे एका राजघराण्यातील सदस्य होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, ते बनारस संस्थानातील महाराज चेतसिंह आणि बलवंतसिंह यांचे वंशज होते. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी सन्मानित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीत राज नारायण यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. इंदिरा गांधींबरोबर त्यांचा संघर्ष सुरू होण्याआधी राज नारायण यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळालेले होते. ते डॉ. राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी होऊन त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. इतकंच नाही तर, राज नारायण यांनी आपली संपत्ती जवळजवळ त्यागली होती आणि कुटुंबियांपासूनही त्यांनी दूर केले होते.
आणखी वाचा : Indira Gandhi : दुर्गा, हुकूमशहा, लोकशाहीवादी : इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील तीन परस्परविरोधी बाजू
राज नारायण यांच्याविषयीचे महत्वाचे मुद्दे
- १९३४ मध्ये, जेव्हा काँग्रेस सोशलिस्ट पार्टीने काँग्रेसमध्ये एका स्वतंत्र गटाची स्थापना केली, तेव्हा राज नारायण हे त्याचा भाग होते.
- स्वातंत्र्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये सहभाग घेतला आणि दोन्ही वेळा ते विजयी झाले.
- १९५२ मध्ये राज नारायण यांनी बनारस सिटी साउथ मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला.
- १९५७ मध्ये, बनारसचे नाव बदलून वाराणसी करण्यात आल्यावर त्यांनी कसवर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली.
- राज नारायण यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विरोध आणि आंदोलनाच्या तत्त्वांचे त्यांनी अखेरपर्यंत पालन केले.
- त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले मात्र, तरीही राज नारायण यांनी डॉ. लोहिया यांच्या तत्वांचे पालन सोडले नाही.
- स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगवास भोगल्यानंतरही, १९४७ नंतर राज नारायण यांनी किमान १४ वर्षे कारावास भोगला.
नारायण शैलीच्या निषेधाची चर्चा
राज नारायण यांनी अनेकदा उत्तर प्रदेशमधील रस्त्यांवर अंग टाकून आंदोलन केली. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत एखाद्या मुद्द्यावर राज नारायण यांनी निदर्शन सुरू केली तर मार्शल त्यांना ओढून बाहेर काढायचे. त्यांची आंदोलने इतकी लोकप्रिय झाली होती की, अशा प्रकारच्या निषेधाला “राज नारायण शैलीचा निषेध” म्हटलं जात होतं. मार्च १९५४ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेत भाषण करताना राज नारायण यांनी स्पष्ट सांगितले होते की, जातिव्यवस्थेवर आधारित होणारा भेदभाव लक्षात घेता मागास आणि दुर्बल वर्गांनी संघटित होणे ही एक ऐतिहासिक गरज आहे.
१९६६ मध्ये केला होता राजकारणात प्रवेश
१९६६ मध्ये राज नारायण यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांचा हा निर्णय मात्र त्यांचे मार्गदर्शक डॉ. लोहिया यांना फारसा आवडला नाही. राज्यसभेतील पहिला कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज नारायण यांनी १९७१ ची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिया गांधी यांच्याविरोधात त्यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. तेव्हा देशभरात इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ हा प्रचारनारा दिला होता. त्याकाळात काँग्रेस हा लोकप्रिय पक्ष असल्यामुळे इंदिरा गांधी यांच्याविरोधात कुणीही निवडणूक लढविण्यास तयार नव्हते; पण राज नारायण यांनी ही कठीण लढत स्विकारली.

इंदिरा गांधींविरोधात घेतली होती न्यायालयात धाव
२४ एप्रिल १९७१ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, ज्यात राज नारायण यांना इंदिरा गांधी यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. परंतु, काही दिवसांनीच राज नारायण यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत इलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेसाठी त्यांचे प्रतिनिधित्व प्रसिद्ध वकील शांती भूषण यांनी केले. त्यांना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सी. बी. गुप्ता यांचंही समर्थन मिळालं होतं, जे १९६९ मध्ये काँग्रेसच्या विभागानंतर इंदिरा गांधी विरोधी गटात सहभागी झाले होते. तरीही, या प्रकरणाकडे सुरुवातीला कुणीही गांभीर्याने पाहिले नाही. यानंतर १९७३ मध्ये राज नारायण यांनी बांका लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली; परंतु, त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
१९७५ मध्ये राज नारायण यांना अटक
१९७४ पर्यंत राज नारायण उत्तर प्रदेशमधून पुन्हा राज्यसभेचे सदस्य झाले होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध जयप्रकाश नारायण चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावली. १७ फेब्रुवारी १९७५ रोजी काँग्रेस सरकारच्या विरोधातील आंदोलन सुरू झाल्यावर राज नारायण यांना अटक करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीवेळी त्यांना जेलमधून नियमितपणे वकील शांती भूषण यांच्या भेटीला नेले जायचे. २ जून १९७५ रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांचा १९७१ चा लोकसभा निवडणूक निकाल रद्द केला. मात्र, त्यांनी पंतप्रधानांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिला. या आदेशानुसार, इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असल्या तरी त्यांना संसदेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती.
इंदिरा गांधींचा केला होता पराभव
उच्च न्यायालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २५-२६ जूनच्या मध्यरात्री इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. या काळात राज नारायण यांनी तब्बल १९ महिने तुरुंगात घालवले. १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी हटवून लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राज नारायण यांनी पुन्हा रायबरेलीमधून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचा तब्बल ५५,००० हून अधिक मतांनी पराभव केला. इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहिणाऱ्या पुपुल जयकर त्यांच्या पुस्तकात लिहितात, “राज नारायण हे राजकारणाच्या रंगभूमीवरील एक विचित्र व्यक्तिमत्त्व होते. मोठे आणि जड खांद्यांचे, सुरुवातीच्या काळात कुस्तीपटू असलेले, ते वाराणसीच्या आखाड्यांमधून राजकारणात आले. काही लोक त्यांना हास्यास्पद मानत असत, तर काहींना ते मातीचे हुशार राजकारणी वाटत होते.”
मोरारजी देसाईंविरोधात आक्रमक भूमिका
‘इंदिरा: द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ या पुस्तकाच्या लेखिका कॅथरीन फ्रँक यांनी राज नारायण यांचे वर्णन इंदिरा गांधींच्या सर्व अडचणींचा मूळ स्रोत म्हणून केले आहे. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर जनता पक्ष सरकार स्थापण्यात राज नारायण यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी मोरारजी देसाईंना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला. देसाईंच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्रालय मिळाले, या खात्याचे नाव बदलून त्यांनी ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण’ असे केले. जनता पक्षात काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी पुढे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे पुत्र कांती देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच जनसंघ सदस्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा मुद्दा मांडून सरकारला संकटात आणले. १ जुलै १९७८ रोजी त्यांना जनता पक्षाच्या कार्यकारिणीमधून आणि केंद्रीय मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले.
मोरारजींना सत्तेतून खाली खेचलं
राज नारायण यांनी मोरारजी देसाई यांच्याविरोधात भूमिका घेऊन पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या चौधरी चरणसिंह यांच्याशी हातमिळवणी केली. चरणसिंह हे आधी जनता पार्टीच्या सरकारमधून बाहेर पडले होते; पण नंतर उपपंतप्रधान व अर्थमंत्रिपद मिळाल्याने ते सरकारमध्ये परत आले. विशेष बाब म्हणजे, याआधी राज नारायण आणि चरणसिंह यांचे एकमेकांबरोबर मतभेद झाले होते. राज नारायण हे चरणसिंह यांचा उल्लेख ‘चिअर सिंग’ म्हणून करीत असतं. यादरम्यान, राज नारायण यांनी काँग्रेसचे नेते संजय गांधी यांची भेट घेतली आणि मोरारजी देसाई यांचे सरकार पाडण्याचा प्लान आखला. दी इंडिय एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संजय गांधी यांनी चंद्रस्वामी आणि राज नारायण यांच्यात भेट घडवून आणली आणि चरणसिंह यांना पाठिंबा देऊन जनता सरकार पाडण्याचे ठरवले.
हेही वाचा : 50 years of Emergency : आणीबाणीच्या काळात पत्रकारितेची मुस्कटदाबी कशी झाली?
शेवटी, राज नारायण, जॉर्ज फर्नांडिस आणि मधु लिमये यांसह काही जनता पक्षाच्या नेत्यांनी मोरारजी देसाई यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. परिणामी त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधानपद मिळविणाऱ्या चौधरी चरणसिंह यांचे सरकारही फक्त २३ दिवसच टिकले. बहुमत चाचणीनंतर त्यांनाही पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. जनता पार्टीचे सरकार गडगडल्याने १९७९ मध्ये देशात पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाल्याने इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या.
१९७९ च्या निवडणुकीत राज नारायण यांचा पराभव
१९७९ च्या लोकसभा निवडणुकीत राज नारायण यांचा वाराणसी मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार कमलापती त्रिपाठी यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्रिपाठी हे समाजवादी पक्षाचे नेते आचार्य नरेंद्र देव यांचे अनुयायी होते. निवडणुकीच्या आधी राज नारायण यांनी कमलापती त्रिपाठी यांची भेट घेतली होती. कारण दोघेही एकाच गुरूचे शिष्य होते; पण राज नारायण हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि त्रिपाठी हे केंद्रात मंत्री बनले. दरम्यान, एप्रिल १९८० मध्ये चरणसिंह यांनी लोक दल पक्षातून राज नारायण यांना काढून टाकले. त्यानंतर दोघांमधील संबंध इतके बिघडले की, १९८४ मध्ये त्यांनी बागपत लोकसभा मतदारसंघातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत राज नारायण यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. यानंतर दोन वर्षांनी ३१ डिसेंबर १९८६ मध्ये राज नारायण यांचे निधन झाले.