Ex cabinet minister arrested in drug case पंजाब दक्षता विभागाने शिरोमणी अकाली दल (एसएडी) मधील ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रम मजीठिया यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापे मारले आहेत. छापेमारीनंतर विक्रम मजीठिया यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पंजाब पोलिस आणि दक्षता विभाग यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या नशाविरोधी अभियानाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढल्याने हा राजकारणातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. २०१२ साली तेहगढ साहिबमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर ६,००० कोटी रुपयांचे सिंथेटिक ड्रग्ज रॅकेटचा समावेश असलेले सर्वात हाय-प्रोफाइल ड्रग्ज तस्करी प्रकरण समोर आले होते. ही अटकही त्याच प्रकरणाशी संबंधित आहे. नेमकं हे प्रकरण काय? माजी महसूल मंत्र्यांना या प्रकरणात अटक का करण्यात आली, त्याविषयी जाणून घेऊयात.
प्रकरण काय? मजीठिया यांच्यावरील आरोप काय?
- ड्रग्ज घोटाळा प्रकरणामुळे २०१४ मध्ये पंजाबमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले होते.
- या प्रकरणातील आरोपी आणि पंजाब पोलिसांनी बडतर्फ केलेले उपअधीक्षक (डीएसपी) जगदीश भोला यांनी न्यायालयात हजेरी लावताना शिरोमणी अकाली दलचे (एसएडी) नेते विक्रम सिंग मजीठिया यांचे नाव घेतले होते.
- भोला यांनी आरोप केला होता की, मजीठिया यांचे ड्रग्ज तस्करी नेटवर्कशी संबंध आहेत.
- त्यावेळी प्रकाश सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील अकाली दल-भाजपा युती सरकारमध्ये मजीठिया हे महसूल मंत्री होते.
- बादल कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांमुळे ते त्यावेळी सर्वात शक्तिशाली मंत्र्यांपैकी एक मानले जात होते.

मजीठिया हे अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांचे मेहुणेदेखील आहेत. मजीठिया यांच्यावर डिसेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत ड्रग्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील पंजाब सरकारच्या दक्षता ब्युरोने पंजाबमधील त्यांच्या घरांसह त्यांच्याशी संबंधित अनेक जागांवर छापे टाकून त्यांना अटक केली.
दक्षता विभागाने २०२१ च्या एनडीपीएस प्रकरणातून मजीठिया यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बेहिशेबी मालमत्ता (डीए) संबंधित गुन्हा नोंदवला. यामध्ये त्यांच्यावर २००७ ते २०१७ पर्यंत मंत्री असताना कथितपणे संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये माजी अकाली दलाचे आमदार आणि मजीठिया यांचे विश्वासू बोनी अजनाला यांनी तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना पत्र लिहून आरोप केला की, त्यांचे एक मित्र मनिंदर सिंग बिट्टू औलख यांना सुखबीर बादल आणि मजीठिया यांच्या दबावाखाली २०१२ च्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात फसवण्यात आले होते. अजनाला हे त्यावेळी अकाली दल-भाजपा सरकारमध्ये मुख्य संसदीय सचिवदेखील होते. मात्र, त्यातील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत.
असे असले तरी, काँग्रेस आणि आप दोघांनीही या मुद्द्यावरून वारंवार शिरोमणी अकाली दलला घेरले आहे. त्यांनी याचा वापर अकाली दल आणि बादल यांना लक्ष्य करण्यासाठी केला. त्यांनी मजीठिया यांना पंजाबमधील ड्रग्ज समस्येचे प्रतीक म्हणून दाखवले आहे. २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी त्यांच्या प्रचाराचा भाग म्हणून याचा वापर केला.
आपविरोधात मानहानी खटले
आपच्या या अजेंडयाला कंटाळत मजीठिया यांनी २०१६ मध्ये आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि आशीष खेतान यांच्या विरोधात राज्यातील ड्रग्ज व्यापाराशी जोडल्याच्या आरोपांवरून फौजदारी मानहानीचे खटले दाखल केले. त्यासाठी मार्च २०१८ मध्ये केजरीवाल आणि खेतान दोघांनीही लेखी माफीनामा जारी केला. परंतु, संजय सिंह यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि ते आता मानहानीच्या प्रकरणात खटल्याला सामोरे जात आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मजीठिया यांच्यावर कारवाई केली नाही, त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला.
कॅप्टन अमरिंदर यांचे एक प्रमुख सहकारी आणि गुरुदासपूरचे विद्यमान खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांचे या मुद्द्यावरून अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद निर्माण झाले. तत्कालीन मंत्री रंधावा यांनी डिसेंबर २०२१ मध्ये मजीठिया यांच्या कथित ड्रग्ज तस्करी संबंधांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यासाठी त्यांनी ४० काँग्रेस आमदारांना एकत्र केले. कॅप्टन अमरिंदर यांचे उत्तराधिकारी चन्नी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये मजीठिया यांच्या विरोधात ड्रग्जशी संबंधित एफआयआर नोंदवण्याचे ठरवले.
परंतु, हे प्रकरण पंजाबमधील नसून कॅनडामधील कथित ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित असल्याचे दिसून आले. राज्यात ड्रग्ज तस्करीत मजीठिया यांचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीही एफआयआरच्या गंभीरतेवर आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. फेब्रुवारी २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी हा खटला दाखल करण्यात आला होता. मजीठिया यांना अटक होण्यापूर्वी प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांना या प्रकरणात पाच महिन्यांहून अधिक काळ पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले आणि ऑगस्ट २०२२ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
मजीठिया यांना धक्का
दक्षता विभागाच्या कारवाईच्या काही दिवस आधी, मजीठिया यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावरून आप सरकारवर तीव्र टीका केली होती. त्यांनी सोशल मीडियावर अमृतसरच्या रस्त्यांवर ड्रग्ज व्यसनी दिसणारे व्हिडीओ अपलोड केले होते, तसेच त्यांनी सरकारच्या ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी राज्यात ड्रग्जशी संबंधित मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली. २०२२ च्या निवडणुकीत भगवंत मान यांनी मजीठिया यांच्यावर टीका करण्यासाठी पंजाबी लोकगीतांचा वापर केला होता. त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीपासून ड्रग्ज विरोधी प्रचारक होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
निवडणुकीत मजीठिया यांनी अमृतसर पूर्व येथून नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु, मजीठिया आणि सिद्धू हे दोघेही आप उमेदवाराकडून पराभूत झाले. त्यांच्या पत्नी गनीव कौर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मजिठा मतदारसंघातून त्यांची पहिली निवडणूक जिंकली. २०२२ मध्ये अकाली दलाने जिंकलेल्या फक्त तीन जागांपैकी ही एक होती. पक्षाच्या इतर दोन आमदारांनी नंतर बंडखोरी केली, त्यामुळे कौर सध्या ११७ सदस्यांच्या विधानसभेत पक्षाच्या एकमेव आमदार आहेत.
अनेक वर्षांपासून मजीठिया आप आणि काँग्रेसवर टीका करत आले आहेत. दोन्ही सरकारांना ड्रग्ज तस्करी संघर्ष करावा लागला आहे, हा राज्यात अजूनही एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. ड्रग्जच्या धोक्याला आळा घालण्यात त्यांच्या सरकारच्या अपयशांवर मजीठिया यांनी वारंवार टीका केली आहे. आप आणि काँग्रेससाठी हे महत्त्वाचे आहे, कारण आतापर्यंत मजीठिया यांच्यावरील ड्रग्जशी संबंधित आरोप सिद्ध करण्यात त्यांना यश आलेले नाही.