दयानंद लिपारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे हादरे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असून शिंदे यांनी त्यांना मोठ्या जबाबदारीसह निधी देण्याबाबत आश्वासित केले आहे. याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेला नव्याने ऊर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी शिवसेनेला राजकीय पटलावर टोकदार सामना करावा लागणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रिय असणाऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. या जिल्ह्यातून आमदार निवडून जाण्याचे त्यांचे स्वप्न हयातीतच पूर्ण झाले होते. तर खासदार होण्याचे स्वप्न त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी दोन खासदार निवडून आणून पूर्ण केले. कोल्हापुरात शिवसेनेचा आमदार एखादा – दुसरा असायचा, पण २०१४ सालच्या निवडणुकीत ही संख्या थेट सहावर गेली.

तथापि, २०१९ सालच्या निवडणुकीत ही संख्या राधानगरी मतदारसंघातील प्रकाश आबिटकर या एकट्याच आमदारापुरती खालावली. निवडणुकीनंतर अपक्ष निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. शिंदे यांनीवेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातून त्यांना साथ मिळाली. शिवसेनेत घुसमट होत असल्याची आबीटकर यांची भावना होती. शिंदे यांच्या माध्यमातून राज्यमंत्रिपद मिळाल्याने यड्रावकर यांनी त्यांच्यासोबत राहण्यात हित असल्याचे ओळखले. मतदारसंघात साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असून शंभर कोटींची कामे सुरू झाली आहेत. याचे श्रेय शिंदे यांना असल्याने त्यांच्यासोबत राहण्यातच पुढे विकासकारण करता येणार आहे, असा त्यांचा हेतू आहे. त्यांच्यासोबत क्षीरसागर हेही गेल्याने शिवसेनेला धक्का बसला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर माजी आमदार, खासदार हेही शिंदे यांच्यासोबत येतील असाही दावा केला जात असल्याने शिवसेनेला फुटीचा धोका संभवतो.

वादाची परंपरा कायम

कोल्हापूरातील शिवसेनेची वादाची परंपरा तशी गेली २० – २५ वर्षे जुनी आहे. गेल्या दहा वर्षात तर जिल्हाप्रमुख –आजी, माजी आमदार यांचा जवळपास प्रत्येक मतदारसंघ वादात राहिला. त्या वादाला संपर्क नेते, संपर्कप्रमुख यांच्याकडून खतपाणी घातले गेले. डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेतील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांनी सत्ताधारी गटाचे हसन मुश्रीफ ,सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रारी करण्यात आल्या. या वादातून खासदार संजय मंडलिक, आमदार आबिटकर यांचे बंधू अर्जुन, बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह सहा जणांनी स्वतंत्र आघाडी केली होती. यड्रावकर – माने या दोघांनाही जिल्हा बँकेचे दार बंद करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील राहतील, अशी गर्जना तेव्हा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली होती. आता यड्रावकर,आबिटकर यांनी स्वतःहूनच शिवसेनेचे दार बंद करून घेतले आहे.

मतदारसंघाची समीकरणे

शिवसेनेमधील पाच माजी आमदारांपैकी चौघांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचे ठरवले आहे. बदलत्या परिस्थितीत राजकारण करताना विधानसभा निवडणूक लढवून यश मिळवणे याची गणिते माजी आमदारांकडून केली जात आहेत. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे पन्हाळा -शाहूवाडी मतदारसंघातून निवडून येतात. यामुळे येथे तेच उमेदवार असल्याने माजी आमदार सत्यजित पाटील यांना सेनेत राहण्याशिवाय मार्ग उरला नाही. अशीच अवस्था हातकणंगले  मतदारसंघात आहे. हा ही मतदारसंघ कोरे यांच्या वाटणीला जाणार असल्याने माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत राहणे पसंत केल्याचे दिसते. यड्रावकर हे शिंदे यांच्यासोबत असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याने शिरोळमध्ये माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिवबंधन कायम ठेवले आहे.

वाटचाल आव्हानास्पद

कोल्हापुरातील शिवसेनेला खिंडार पडले असताना ही दरी बुजवून किल्ला अभेद्य ठेवणे आव्हानास्पद बनले आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापुरातील शिवसेना पुन्हा बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यापूर्वी अनेकदा शिवसेनेने पूर्वीप्रमाणे सहा आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. हे साध्य करायचे तर शिवसेनेला निम्म्या मतदारसंघात आपल्या जुन्या सहकाऱ्यांचीच सामना करावा लागणार आहे. उर्वरित ठिकाणी सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. सत्ता वर्तुळाबाहेर राहिलेल्या शिवसेनेला खासदार, माजी आमदार,पक्ष पदाधिकारी यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्याकडून आणखी धक्के मिळाले तर पुढील वाटचाल आणखी काटेरी असेल हे नक्की