लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर शृंगारे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अतिशय अस्वस्थता आहे. भाजपने दगा दिला. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही उदगीर विधानसभेची निवडणूक लढवा, असा आग्रह कार्यकर्ते धरत असल्याचे सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. त्यामुळे ते पुन्हा विधानसभेला बाशिंग बांधण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधाकर शृंगारे यांचा राजकारणाचा पिंड नाही. तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पावणेतीन लाख मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात त्यांच्या खासदार निधीतून कामे झाले होती. विविध उपक्रमांना ते आर्थिक मदतही देत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडूनच दगा फटका झाला, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. ‘राजकारणातून तुम्ही संन्यास घेऊ नका, कोणत्याही पक्षाकडून तिकीट घ्या, मात्र निवडणुकीत उभे राहा. आम्ही कोणासाठी काम करायचे?’ असा प्रश्न त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. आपण अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रहही मोडवत नाही, असे शृंगारे म्हणाले.

हेही वाचा – आपटीबार: राजकीय ऱ्हासाचा ‘भुयारी’ मार्ग

हेही वाचा – मावळतीचे मोजमाप: कृषी क्षेत्र; सिंचनसमस्या भिजत, कर्जमाफी अधांतरी आणि कांदाकोंडी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा निवडणूक लढवावी की नाही यावर विचार सुरू असल्याचे शृंगारे यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून उदगीर विधानसभा मतदारसंघात शृंगारे यांचे फलक लागले आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत त्यांना मताधिक्य पण मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याच्या मानसिकतेत ते सध्या आहेत. महायुतीत संजय बनसोडे राष्ट्रवादीकडून (अजित पवार) निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. पर्यायाने भाजपात हातपाय हलवण्यापेक्षा अन्य पक्षांमधून उमेदवारी मिळवण्यासाठी शृंगारे यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकेकाळी भाजपात मर्यादित कार्यकर्ते होते, तेव्हा पक्षात एखादा कार्यकर्ता यावा यासाठी अनेक जण प्रयत्न करायचे. किंवा नाराज होऊन कोणी बाहेर जात असेल तर तो बाहेर जाऊ नये, पक्षातच राहावा यासाठी पण कार्यकर्ते धडपड करायचे. मात्र आता भाजपात सुबत्ता आल्यामुळे कोणी आला काय आणि गेला काय? कार्यकर्त्यांबद्दल कोणालाच काही वाटेनासे झाले आहे. तोच अनुभव भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे घेत असल्यामुळे ते कदाचित पक्ष सोडून उदगीर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करतील, अशी चर्चा सुरू आहे.