-संजीव कुलकर्णी

नांदेड : नांदेडमधील माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्षासोबत राहून काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी मंगळवारी तसे जाहीर केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकारण, शिक्षण तसेच इतर क्षेत्रांतील अत्यंत निकटचे सहकारी असलेल्या सावंत यांनी २००९ ते १९ दरम्यान काँग्रेसतर्फे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील इतर अनेक समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला, तरी सावंत यांनी मात्र भाजपात न जाण्याची भूमिका घेतली. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान ते राजकीयदृष्ट्या अलिप्त राहिल्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या बाबतीत काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

काँग्रेस पक्षाने सर्व जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मुंबईत गेलेल्या सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात प्रभृतींची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्या समोर मांडली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राज्यप्रभारी रमेश चेन्निथला यांचीही भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियानाला साकडे

सावंत यांच्याशी संपर्क साधला असता काँग्रेस नेत्यांशी झालेल्या भेटीच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला; पण चर्चेचा तपशील न सांगता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षाच्या विहित प्रक्रियेनुसार अर्ज करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले. महाविकास आघाडीत नांदेड उत्तर मतदारसंघावर पहिला दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. पण काँग्रेस नेते ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसचे प्रभारी चेन्निथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात येत्या शनिवार-रविवारी नांदेडला येत असून या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी सुरू झाली असल्याची माहिती पक्षाचे राज्य सचिव श्याम दरक यांनी येथे दिली.

हेही वाचा…धुळ्यात भाजपचे वरातीमागून घोडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ.शंकरराव चव्हाण, बळवंतराव चव्हाण आदी पूर्वसुरींच्या व्यापक-धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा पुढे नेणार्‍यांची नांदेड जिल्हा काँग्रेसला आज गरज आहे. आम्ही कार्यकर्ते आमच्या परीने काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जात आहोत. या पार्श्वभूमीवर डी.पी.सावंत यांनी पक्षनेत्यांसह माझ्याशीदेखील चर्चा केली. काँग्रेससोबतच राहण्याच्या त्यांच्या भूमिकेचे नांदेडचा खासदार या नात्याने मी स्वागत करतो. – वसंतराव चव्हाण, काँग्रेस खासदार, नांदेड