ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाल्यानंतरही शिवसेनेने (ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. ठाणे शहर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात भाजप विरोधात माजी खासदार राजन विचारे यांनाच रिंगणात उतरविण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरु असून उमेदवारी मिळत नसल्याने नाराज असलेले शिंदे गटातील काही नाराज गळाला लागतात का, याची चाचपणीही केली जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ जागा महत्वाच्या असून महापालिका हद्दीत असलेल्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघावरही त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यापैकी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो.

हेही वाचा >>>हरियाणात पराभव होताच, काँग्रेसची मित्रपक्षांकडून कोंडी; शिवसेना, सपा, तृणमूल, द्रमुक पक्षानं सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेतील फुटीननंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना( शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरे) माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ठाणे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर गेले. कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या आणखी दोन मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय देखील आग्रही आहेत. हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास शिंदेसेनेत नाराजी उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्शभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना (ठाकरे) नेते व माजी खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठाकरे गटात सुरु असल्याचे समजते. विचारे हे २००९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे शहरासोबतच, कोपरी- पाचपखाडी आणि ओवळा- माजीवडा हे तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या जागा ठाकरे गटाला सोडण्याची चर्चा महाविकास आघाडीत सुरू असून यामुळे या तिन्ही मतदार संघात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच आमच्या पक्षाचे उमेदवार कोण असेल हे पक्षप्रमुख ठरवतील आणि या उमेदवारांची यादी दसऱ्याला जाहीर होण्याची शक्यता आहे.- राजन विचारे, शिवसेना (ठाकरे)