जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचा दबदबा होता. कालौघात जैन बाजुला सारले गेले; खडसे अजुनही सक्रीय आहेत. दोघांमध्ये तसे पूर्वीपासूनच राजकीय वैर असल्याने एकमेकांचे फार कधी जमले नाही. परंतु, बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील कटुता कमी होऊन आता पुन्हा जवळीक वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

१९८० ते २०१४ या कालावधीत सुरेश जैन यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा पक्ष बदलले. परंतु, प्रत्येक वेळी मतदारांनी त्यांना सहजपणे निवडून दिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना, या काही पक्षांकडून जळगावमधून सलग नऊ वेळा मोठ्या मताधिक्याने विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला. जळगाव मतदारसंघातच नव्हे तर राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व वाढविण्यासाठी सुरेश जैन सातत्याने प्रयत्नशील असताना, त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी बरेच प्रयत्न केले. जैन यांनी जेव्हा केव्हा पक्ष बदलून विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा त्यांच्या विरोधातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खडसे यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. परंतु, जैन शेवटपर्यंत खडसेंना पुरुन उरले.

जैन यांना जळगाव घरकूल गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली. कारागृहातूनच त्यांनी २०१४ ची निवडणूक शिवसेनेकडून लढली. अर्थात, ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली. आणि जळगाव शहरावर भाजपची सत्ता आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी बिनसले होते. दुसरीकडे जैन आणि खडसे यांच्यातील राजकीय वैर कायम होते. त्यामुळे जैन यांना आपल्याच पाठपुराव्यामुळे कारागृहाची हवा खावी लागली, असे खडसे त्यावेळी राजकीय भाषणांतून जाहीरपणे सांगायचे. जैन कारागृहात असताना खडसेंनी जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

काही वर्षांनी सुरेश जैन कारागृहातून बाहेर आल्यानंतरही एखादा अपवाद वगळता दोन्ही नेते समोरासमोर कधी आले नाहीत. किंवा एकमेकांविषयी काहीच बोलले नाहीत. मात्र, जिल्हा सहकारी बँकेने जळगावमधील दगडी बँक विक्री काढल्याच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी अचानक सुरेश जैन यांची आठवण काढून सर्वांना धक्का दिला. सुरेशदादा जैन यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना दगडी बँकेत बसूनच कारभार पाहिला होता, असे विधान खडसे यांनी केले. त्याद्वारे दोघांमधील कटुता कमी झाल्याचा प्रत्यय आल्याने राजकीय वर्तुळातूनही आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी असल्याची चर्चा आहे.

सुरेशदादा जैन आणि माझ्यात राजकीय मतभेद असले तरी पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणाव्यतिरिक्त मैत्री आजही कायम आहे. एकनाथ खडसे (आमदार तथा ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी शरद पवार गट)