केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १ जून रोजी कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या राजकीय मेळाव्यात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजवण्याचे संकेत गृहमंत्री अमित शाहांनी दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शाह यांनीच या मेळाव्यासाठी आग्रह धरला होता. राज्यातील केवळ वरिष्ठ नेतृत्वच नाही, तर मंडळ अध्यक्षांच्या पुढील काही महिने हातात असतील आणि त्यांची भूमिका काय असेल हे स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमध्ये जवळपास १३०० भाजपा मंडळे आहेत. यावेळी नवीन मंडळ अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले असले तरी संपूर्ण जिल्हा आणि राज्य नेतृत्वाला १ जून रोजी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील एका गटात अशी भावना वाढत आहे की, वर्षभरापासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ज्या राजकीय परिस्थितीत आहे, त्याचा फायदा त्यांना घेता आलेला नाही. संदेशखलीतील आरोप असो किंवा डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात निदर्शने असो किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्याच आदेशानंतर नोकऱ्या गमावलेल्या आंदोलक शिक्षकांचा सुरू असलेला निषेध असो या सर्व मुद्द्यांसंदर्भात गृहमंत्री राज्यातील भाजपा गटाला योग्य दिशेने पुढे नेतील, अशी अपेक्षा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी शाह दिल्लीहून दररोज त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आले होते. त्यावेळी मध्य प्रदेशातही राज्यात भाजपामध्येही अशीच गोंधळाची परिस्थिती होती.

“अशा अनेक बैठकांमध्ये गृहमंत्र्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मला अपेक्षा आहे की, ते नेतृत्वासंदर्भात उत्साहित असतील. १ जून रोजी अमित शाह यांनी मुर्शिदाबाद आणि ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उपस्थित केला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. पक्षातील दिलीप दा घोष यांच्या भवितव्याबाबत अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असेलही. त्यांचे ममता बॅनर्जींशी असलेले संबंध आमच्यापैकी कोणालाही आवडत नाहीत आणि शाह यांनादेखील याची कल्पना आहे”, असे बंगाल भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेच्या बैठकीनंतर शाह एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, शाह स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानाला भेट देऊ शकतात. स्वामी विवेकानंद हे एक बंगाली व्यक्तिमत्त्व होते. बंगाल भाजपाचे पुढचे प्रमुख होण्याच्या शर्यतीत असलेल्या भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जी या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण करणार असल्याचे कळते. तसेच अनेक संतही या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये आयुष्मान भारत योजनेबाबत बोलतानाही गृहमंत्री शाह यांनी बंगालबाबत उल्लेख केला होता. “मोदी सरकारच्या कार्याचे परिणाम म्हणून दिल्लीत कमळ खुलले आणि इथे आयुष्मान भारत योजना आली. देशातील प्रत्येक गरीब नागरिकाला उपचारासाठी पाच लाख रुपयांचा खर्च या योजनेंतर्गत मिळेल. आता फक्त बंगाल उरले आहे, तिथेही कमळ खुलेल आणि आयुष्मान भारत योजना लागू होईल”, असे ते म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत; मात्र त्यांची चाहूल आतापासूनच लागली आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या वेळी त्याची झलक दिसली होती. त्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने अनेक ठिकाणी शोभायात्रा काढत एकमेकांविरुद्ध शक्तिप्रदर्शन केले होते. २०२१ मध्ये भाजपा पहिल्यांदा विरोधी पक्ष म्हणून आले होते. आता २०२६ मध्ये भाजपा तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, भाजपासाठी बंगाल जिंकणे तसे सोपे नाहीच. हरयाणा आणि दिल्लीत ज्या प्रकारे आरएसएस पक्षाची ढाल होती, त्याच प्रकारे बंगालमध्येही आरएसएस तशीच भूमिका निभावण्याचा प्रयत्न करीत आहे.