सांगली : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म खुंटीला टांगून अपक्षासाठी एकत्र आलेल्या सांगलीतील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा गटबाजीची बीजे दिसू लागली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या विरोधात बोलणार्‍यांचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनावेळी ही गटबाजी प्रकर्षाने समोर आली. या गटबाजीवर नियंत्रण ठेवून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणे हेच या निवडणुकीत काँग्रेसपुढे आव्हान राहण्याची चिन्हे आहेत.

खासदार विशाल पाटील यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेने जागा वाटप जाहीर होण्यापुर्वीच पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. याबाबत काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी खासदार विशाल पाटील यांना सोबत घेउन जागा वाटपाचा लढा अगदी दिीपर्यंत नेला. अखेर महाविकास आघाडीने या मागणीचा विचार केला नाही. उमेदवारीच्या घोळामागे जिल्ह्यातीलच एक मोठा नेता असल्याचा समज जाणीवपूर्वक माध्यमातून पेरण्यात आला. अखेर काँग्रेसचीच बंडखोरी असल्याचा दावा करत खासदार पाटील यांची उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल झाली. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून या उमेदवारीला समर्थन न देताही डॉ. कदम यांना आपली जिल्ह्यातील ताकद दाखवावी वाटली. आणि ती त्यांनी भाजपचा मोठ्या फरकाने पराभव करून दाखवून दिली. यामागे कदम यांच्या गटाची ताकद तर होतीच, पण याचबरोबर वसंतदादा घराण्याची श्रध्दाही होती. दादा घराण्याने ही अस्तित्वाची लढाई केल्याने आणि लोकांनीच निवडणूूक हातात घेतल्याने अपक्षाचा विजय झाला. विजयानंतर खासदार पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर वैजापूरचे राजकारण तापले

तथापि, या निवडणुकीत खासदार पाटील यांना सांगलीमध्ये १९ हजाराहून अधिक मताधियय मिळाल्याने काँग्रेसची ताकद लक्षात आली. भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असल्याने काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. एवढेच नाही तर जर काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तरी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करत विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, गत निवडणुकीत भाजपला कडवी झुंज देत सहा हजार मतांनी पराभूत झालेले शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रबळ दावा आहे. अशा स्थितीत गेल्या दोन दिवसात राहूल गांधी यांच्याविरोधात बोलणार्‍या विरोधी नेत्यांचा निषेध करण्यासाठी तीन स्वतंत्र आंदोलने सांगलीकरांना पाहण्यास मिळाली.

हेही वाचा >>> सोलापुरात भाजपविरोधात धर्मराज काडादींना उमेदवारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि खासदार पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला. तर श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखालील मदन पाटील युवा मंचने मंगळवारी आमदार गायकवाड यांचा निषेध केला. प्रदेश काँग्रेस समितीकडून आदेश आल्यानंतर पुन्हा गुरूवारी निषेध आंदोलन करण्यात आले. तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही स्वतंत्र रित्या निषेध आंदोलन केले. यावरून काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र सांगलीकरांना पाहण्यास मिळाले. स्व. पतंगराव कदम यांचे एक वायय यामुळे पुन्हा पुन्हा आठवते ते म्हणजे काँग्रेसचा पराभव केवळ काँग्रेसच करू शकते, अन्य पक्षामध्ये तेवढी ताकद नाही हेच खरे म्हणायचे का? आता या स्वतंत्र आंदोलनानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांची भूमिका काय हे उमेदवारीच्या वाटपावेळी समोर येईलच. तोपर्यंत सवतासुभा हीच काँग्रेसची संस्कृती म्हणावी लागेल.