Haryana Election 2024: हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरु आहेत. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह आदी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आपल्याच पक्षाच्या जास्त जागा कशा निवडून येतील? यासाठी सध्या रणनीती आखली जात असून सध्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी ६७ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तरीही हरियाणातील भाजपाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

आता काँग्रेसच्या घराणेशाहीवर कायम नाके मुरडणाऱ्या आणि टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाचा आता घराणेशाहीचा विरोध कुठे गेला? असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांनी उपस्थित केला आहे. भाजपाने जाहीर केलेल्या ६७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत विविध राजकीय घराण्यांशी संबंधित अनेक चेहरे आहेत. यामध्ये कमीत कमी आठ राजकीय घराणेशाही पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. त्यातील बहुतांश नेते काँग्रेसच्या संबंधित आहेत. यामध्ये जेष्ठ नेते विनोद शर्मा यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांच्या आई शक्ती राणी शर्मा यांना कालका मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?

तसेच माजी आमदार कर्तारसिंग भडाना यांचे पुत्र मनमोहन भडाना यांना समलखा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. १९९९ मध्ये राज्यात इंडियन नॅशनल लोक दल (INLD) सरकार स्थापन करण्यात भडाना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यावेळी आमदारांच्या एका गटाने हरियाणा विकास पार्टीमधून वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी देवीलाल यांचा मुलगा ओम प्रकाश चौटाला यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले होते. पुढे २०१२ मध्ये कर्तारसिंग भडाना यांनी राष्ट्रीय लोक दल (RLD) च्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली होती. आता काही महिन्यांपूर्वीच कर्तारसिंग भडाना यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

याबरोबरच केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची मुलगी आरती राव यांना अटेली मतदारसंघातून भाजपाने तिकीट दिले आहे. ज्येष्ठ नेते राव इंद्रजित सिंह यांनीही दशकभरापूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाच्या या यादीत आणखी एक नेता म्हणजे ज्येष्ठ नेते किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी ज्यांनी जून २०२४ मध्ये काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. आता श्रुती चौधरी यांनाही भाजपाने तोशाममधून उमेदवारी दिली आहे. तसेच कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई याला आदमपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई यांनी २००७ मध्ये काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर हरियाणा जनहित पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर कुलदीप बिश्नोई यांनी २०११ ते २०१४ या दरम्यान भाजपाबरोबर युती केली होती. पुढे २०१६ मध्ये त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. यानंतर २०२२ मध्ये कुलदीप बिश्नोई यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ‘आयएनएलडी’चे माजी आमदार हरिचंद मिड्ढा यांचे पुत्र कृष्णा मिड्ढा यांना पुन्हा जिंदमधून उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्येही कृष्णा मिड्ढा यांनी जिंद जिंकले होते आणि भाजपाने पहिल्यांदाच ही जागा जिंकली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भोंडसी कारागृह अधीक्षक सुनील सांगवान यांच्या कार्यकाळात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला अनेकदा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. आता त्यांना चरखी दादरी या मतदारसंघातून सुनील सांगवान यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. ते माजी खासदार सतपाल सांगवान यांचे पुत्र असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच भाजपाकडून राव नरबीर सिंग यांना बादशाहपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. ते हरियाणाचे माजी मंत्री राव महावीर सिंह यादव यांचे पुत्र आणि पंजाबचे दिवंगत आमदार मोहर सिंह यादव यांचे नातू आहेत.