कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघ असलेल्या गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आली असल्याचे ढोल वाजवले जात असले तरी ती लोणकढी थाप ठरली आहे. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबरीने काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचाच बोलबाला दिसून आला. उलट विरोधी गटाच्या पण भाजपच्या असलेल्या संचालिका शौमिका महाडिक यांचीच सभेत पद्धतशीरपणे मुस्कटदाबी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा गेले महिनाभर गाजत होती. तालुक्याच्या संपर्क मेळाव्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संचालक मंडळाला वासाचे दूध परतावा, व्यवस्थापन खर्चातील भरमसाठ वाढ, संचालकांच्या खर्चातील वाढ यासह अनेक मुद्द्यांवरून जेरीला आणले होते. अशातच विरोधी संचालिका असणाऱ्या शौमिका महाडिक यांनीही सभेत आवाज उठवणार असल्याचे म्हटल्याने संचालक मंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींना बळ मिळालेले होते.
मुश्रीफ – पाटील यांचेच वर्चस्व
काल गोकुळची सभा पार पडली तेव्हा त्यामध्ये कोठेही महायुतीची सत्ता आल्याचे चित्र तसूभरही दिसले नाही. त्यामध्ये शाहू विकास आघाडीचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचाच प्रभाव दिसून आला. सभा सुरू झाल्यापासून कागल आणि करवीर तालुक्यातील प्रतिनिधी सतेज पाटील – हसन मुश्रीफ यांचा जयघोष करीत होते. त्यांचा आवाज इतका जोरात होता की विरोधकांना बोलणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता असल्याचा दावा वरकरणी केला जात असला तरी ती दिल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेते कार्यकर्त्यांची उघड उघड दिशाभूल ठरली आहे.
पिता – पुत्रांनी डावलले
सभेवेळी प्रत्यक्षात भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचाच आवाज जाणीवपूर्वक दाबला गेला तोही महायुतीतील वजनदार मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांच्या साक्षीने. महायुतीतील दोन प्रमुख घराण्यातील हे ऐक्य विचार करायला लावणारे होते. विरोधी संचालक त्यातही एखादी महिला आपल्याच संस्थेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारत असेल तर त्यास बोलण्याची संधी देणे अपेक्षित असते. पण याबाबत हसन मुश्रीफ यांनी याबाबतीत कसलाही हस्तक्षेप केला नाही. उलट सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाला मुश्रीफ – सतेज पाटील यांची मुकसंमती राहिली. संस्थेचे अध्यक्ष मंत्री पुत्र नविद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांची उत्तरे सभेच्या शेवटी दिली जातील असे आश्वसित केले होते. परंतु, उत्तरे लिखित स्वरूपात दिली आहेत असे सांगून महाडिक यांची बोळवण केली. त्यातून सभेच्या एकूणच कामकाजाचा बोजवारा उडाला.
छायाचित्रातही राजकारण
गोकुळच्या अहवालामध्ये लोकप्रतिनिधींचे स्थान दिले असले तरी त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची यांची छायाचित्रे पद्धतशीरपणे वगळण्यात आली होती. दूध संघातील गोकुळच्या सत्ताधाऱ्यांची ही रणनीती पाहता गोकुळमध्ये भाजपची सत्ता असल्याचे कुठलेही नामोनिशान उरलेले नव्हते. उलट चार वर्षापूर्वी या संस्थेची निवडणूक लढवताना जे चित्र होते तेच सभेत ठळकपणे दिसले. सत्ताधारी शाहू आघाडीचेच आजी – माजी आमदार, खासदार यांच्या छबी अहवालात झळकत होत्या. काहींच्या घरातील उमेदवार पराभूत झाले असतानाही त्यांचेही छायाचित्र आवर्जून प्रसिद्ध करून एक प्रकारे महाडिक यांना खिजवण्यात आले.
महायुतीला हरताळ
एकूण परिस्थिती पाहता गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली हे केवळ कागदी घोषणेपुरते राहिले असून प्रत्यक्षात संघाच्या कारभाराची सूत्रे हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडेच असल्याचे अधोरेखित झाले आहे. किमान वार्षिक सभेच्या निमित्ताने तरी गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आहे हे दिसेल असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात त्यास उघडपणे हरताळ फासला गेला.
