वसई: महापालिका निवडणुकांचे कारण देत डिसेंबर महिन्यात होणारी मॅरेथॉन पालिकेने रद्द केली आहे. मात्र मॅरेथॉन रद्दच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची राजकीय कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

आगामी महापालिका निवडणूकासाठी वसई विरारमधील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आणि वसईत विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या सत्ताबदलानंतर होणारी पालिकेची ही पाहिलीच निवडणूक असणार आहे. एकीकडे खड्डेमय रस्त्याच्या विषयावरून बविआ आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन पुढे ढकलण्यात आल्याच्या मुद्द्यावरून वसईत राजकीय चर्चानां उधाण आले आहे. यामुळे सत्ताधारी भाजपाकडून ठाकुरांची राजकिय कोंडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता असताना वसईत मॅरेथॉन सुरु करण्यात आली होती. भव्य दिव्य स्वरूपात होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे शहरात एक चांगला उपक्रम सुरु करण्यात आल्याबद्दल वसईतील क्रीडाप्रेमी नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले होते. तसेच मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरातील धावपट्टू देखील यात सहभागी होत असतात . ही मॅरेथॉन जरी महापालिकेची असली तरी सुद्धा त्यांच्या नियोजनासाठी बविआ व त्यांचे आजी माजी नगरसेवक नेहमीच आघाडीवर होते. त्यामुळे या मॅरेथॉन आयोजनावर हितेंद्र ठाकूरांच्या बविआचा वरचष्मा राहिला आहे.

त्यातच आता यावर्षी डिसेंबरमध्ये होणारी मॅरेथॉन निवडणुकीचे कारण पुढे करत रद्द झाली आहे. मॅरेथॉन पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे यापूर्वी कोरोनाचे संकट वगळता सातत्याने बारा वर्षे ही मॅरेथॉन स्पर्धा होत होती. आता ही स्पर्धा रद्द झाल्याने निवडणुकीपूर्वी एक प्रकारे वर्चस्ववादी ठरलेल्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर दुसरीकडे मॅरेथॉनच्या निर्णयावर बविआ वगळता अन्य राजकीय पक्षांची मात्र मौन बाळगले आहे.

मॅरेथॉन रद्द होणे दुर्दैवी आहे- हितेंद्र ठाकूर

भारतातील पाच राष्ट्रीय मॅरेथॉन पैकी वसई विरारची एक मॅरेथॉन आहे. तीच मॅरेथॉन रद्द होते हे दुर्दैव आहे. वसई विरार सारखी मॅरेथॉन अन्य कुठे नसते अशा प्रतिक्रिया धावपटूंच्या असतात. याशिवाय मॅरेथॉनमुळे शहराचे नाव ही देश भरात जात आहे.तीच बंद झाली तर खेळाडू नाराज होतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली.

यापूर्वी रंगावरून राजकारण ?

वसई विरार महापालिकेच्या मॅरेथॉनवेळी मॅरेथॉन मार्गावर यापूर्वी झाडांना, खांबांना पिवळा व हिरवा रंग दिला जात होता. मात्र विधानसभेच्या सत्ता बदलानंतर मागील वर्षी झालेल्या मॅरेथॉन मध्ये तो रंग बदलून पांढरा व भगवा रंग देण्यात आला होता. त्यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

भाजपाचे बविआला धक्कातंत्र

वसई विरार शहरात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या झालेल्या सत्ता बदलानंतर आता भाजपाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी महापालिकेत वर्चस्ववादी ठरलेल्या बहुजन विकास आघाडीची विविध मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी बविआ पक्षातील माजी नगरसेवक व नेते, तसेच कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश करून बविआला धक्का दिला होता. आता मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय हा देखील भाजपाच्या धक्का तंत्राचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.