मुंबईः राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टीक- कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

महेश शिंदे, कैलास पाटील, नारायण कुचे आदी सदस्यांनी प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

फ़ुलशेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान,काढणीपश्चात प्रशिक्षण, हरितगृहातील आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र बाजारात कृत्रिम फुले येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासह पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच बैठक घेऊन यावर नियंत्रणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही गोगावले यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात अलिकडच्या काळात प्रत्येक समारंभ, मंगल कार्यालय,मंदीरे, उत्सवात प्लास्टीकच्या फुलांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे फूल शेती करणारा २० -२५ टक्के शेतकरी अडचणीत आला असून फूलशेती संकटात आल्यास मध उत्पादनावरही विपरित परिणाम होईल असे सांगत प्लास्टीक फुलावर तातडीने बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.