Bihar Assembly Elections 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रविवारी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यातील २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला देण्यात आल्या. भाजपाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. चिराग पासवान यांना आपल्या राजकीय प्रभावापेक्षा अधिक जागा मिळाल्याचे खुद्द भाजपातील सूत्रांनी मान्य केले आहे. पक्षाच्या या निर्णयामागची कारणेही त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. भाजपाने जागावाटपात चिराग पासवान यांना झुकते माप का दिले? त्याबाबत जाणून घेऊ…

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध आणि मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने चिराग पासवान यांना जागावाटपात झुकते माप दिल्याचे भाजपातील एका सूत्राने सांगितले. चिराग पासवान हे राज्यातील दलित समुदायाचे नेते मानले जातात. आगामी निवडणुकीत या समुदायाची मते अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ही मते पक्षापासून दुरावली जाऊ नये म्हणून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी जागावाटपात तडजोड केल्याचे सांगितले जात आहे.

२०२० मध्ये बसला होता जेडीयूला फटका

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग नव्हता. त्यावेळी चिराग पासवान यांनी स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला असला तरी अनेक मतदारसंघांमध्ये त्यांनी निर्णायक प्रभाव टाकला होता. लोकजनशक्ती पक्षामुळे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेटचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचे आकडेवारीतून समोर आले होते. यंदाच्या निवडणुकीत हा धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने चिराग यांना जागावाटपात झुकते माप दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा : IRCTC Scam Case : लालूंना अडचणीत आणणारा कथित आयआरसीटीसी घोटाळा काय आहे?

चिराग पासवान यांनी हेरली बाजू

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिहारमधील दलित मतदारांनी मोठा पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत या मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. परिणामी राज्यात अपेक्षेपेक्षा जागा जिंकण्यात भाजपाला अपयश आले होते. चिराग यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ही कमकुवत बाजू अचूकपणे हेरली होती. जागावाटपात मोठा वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी मे महिन्यापासूनच आपली मागणी जोरकसपणे मांडली. यादरम्यान त्यांनी केंद्रातून थेट राज्यात येण्याचा मानसही बोलून दाखवला आणि राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा मुद्दा उपस्थित करीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

नितीश कुमार यांच्यावर केली होती टीका

चिराग पासवान यांच्या टीकेमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड पक्षाने याबाबत दिल्लीतील भाजपा नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपाने चिराग यांच्याशी तडजोड करून त्यांना टीका सौम्य करण्याचा सल्ला दिला. जेडीयूच्या एका नेत्याने सांगितले की, चिराग यांनी वापरलेली ही रणनीती दबावतंत्राचा भाग होती. त्याद्वारे अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात ते यशस्वीही झाले. चिराग पासवान यांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी प्रत्यक्ष ते विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत.

२०२१ मध्ये पडली होती ‘लोजपा’मध्ये फूट

२०२१ मध्ये एकसंध लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडली होती. त्यावेळी चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी पक्षातील सहा खासदारांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला होता. इतक्यावरच न थांबता त्यांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरही आपला दावा सांगितला. त्यावेळी चिराग पासवान यांना मोठ्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागला होता. या फुटीसाठी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जबाबदार धरले होते. “चिराग यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हनुमान’ घोषित केले असले तरी राजकीय गणितामुळे भाजपाला पारस यांच्यासोबत जावे लागले,” असे एका पक्षातील एका नेत्याने सांगितले होते.

हेही वाचा : Shiv Sena-MNS Alliance : मुंबईतील २२७ पैकी ‘इतक्या’ प्रभागांमध्ये मनसेचा दरारा; ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला फटका?

चिराग यांनी पक्षाला कशी दिली बळकटी?

दरम्यान, पक्षफुटीनंतर चिराग पासवान यांनी बिहारमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेला दलित समुदायाने प्रचंड प्रतिसाद दिला. चिराग यांच्यावर मात करण्यासाठी नितीश कुमार यांनी पशुपती पारस यांना जेडीयूकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाने त्वरित त्यांची हालचाल समजून घेत पारस यांना आपल्याबरोबर कायम ठेवले. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी चिराग पासवान यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. या पत्रानंतर २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीत ‘लोजपा’ला किती यश मिळणार?

चिराग पासवान यांच्याकडे आजही पासवान समुदायाची पाच टक्के मते आहेत. शिवाय त्यांना राज्यातील दलित मतदारांचाही मोठा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाने एकूण पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. या पाचही मतदारसंघात त्यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पासवान यांना स्थानही मिळाले. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही लोकजनशक्ती पक्षाला कौल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे भाजपाने जागावाटपात तडजोड करून त्यांना २९ जागा दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यंदाच्या बिहार निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षाला किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.