अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर अलिबाग शहरात त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र या बॅनरवरून उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. याबॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. अनंत दिघे यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही. विचार बाळासाहेबांचे आणि जिद्द धर्मवीरांची यावर निष्ठा शिवसैनिकांची असा संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

बंडखोर आमदार आपण शिवसेनेत असल्याचे सांगत असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते चांगलेच दुरावले असल्याचे यावरून दिसून येत आहे. महाड येथे भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. तेव्हापासून शिवसेना पक्ष संघटनेत मोठी फुट पडण्याची चिन्ह दिसू लागली होती. तर ज्यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष राज्यात सत्ता उपभोगली आणि असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आता आमदारांना नकोसे झाल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांमुळे मतदारसंघात शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हे शिवसेनेसोबत असल्याचे अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले होते. मात्र त्याच वेळी आमदार दळवी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आम्ही आमदारांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल कशी होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.