छत्रपती संभाजीनगर : पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, ३७० कलम रद्द करणे, तीन तलाकच्या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप प्रचाराची मोहीम एमआयएएम म्हणजेच ‘मजलीस’ विरोधाची असेल अशी रणनीती ठरविण्यात आल्याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या भाषणातून दिले.
‘मजलीस’ ला उखडून टाकायचे असेल तर घोषणांचा आवाज वाढवायला हवा, अशी भाषणाची सुरुवात करून अमित शहा यांनी चुकीचे मतदान केल्याने देशातील संसदेत चांगली कामे करताना तुमचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नव्हता, हे पटवून देण्यावर त्यांचा भर हाेता. ‘मजलीस’बरोबरच उद्धव ठाकरे यांच्यावरही भाजपने टोकदार टीका केली. हिंदुत्वाचे बहुरुपी अशी उपमा देत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कसा प्रचार असेल याचा नमुना आपल्या छोटेखानी भाषणातून दाखविला. ‘जनाब बाळासाहेब’ असे लिहिणारे आणि सरकारमध्ये असताना अडीच वर्षे औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावर काही निर्णय न घेता सरकार अल्पमतामध्ये आल्यानंतर संभाजीनगर असा ठराव घेण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने कसा पुढे नेला याची माहिती दिली. मजलीस आणि उद्धव ठाकरे एका बाजूने उभे आहेत, असा प्रचाराचा नूर राहावा, असे भाजपचे प्रयत्न पुढील काळातही राहतील, असे अधोरेखित करण्यात आले.
हेही वाचा… वंचितबाबत संभ्रम वाढला
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेदरम्यान नव्याने निवडून आलेले राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण आणि प्रचारातील भाषणांसाठी पंकजा मुंडे यांना बढती मिळाल्याचे चित्र दिसून आले. भाजपच्या व्यासपीठावरुन बोलताना अशोक चव्हाण यांनी आपण दुसऱ्या पक्षात असतानाही कधी टीका केली नाही, असे आवर्जून स्पष्ट केले. ‘अब की ४०० पार’ या घोषणेला सार्थ अशी साथ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या भाषणाने ते आता रावसाहेब दानवे, राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पंकजा मुंडे यांच्याबरोबरीचे नेते असतील, असा संदेश भाजपच्या मंडळींसाठी देण्यात आला आहे.
हेही वाचा… रायगडच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद ?
अमित शहा यांनी भाषण करताना नेत्यांची घेतलेली नावे आणि त्याची क्रमवारी लक्षात घेता रावसाहेब दानवे यांचा मित्र म्हणून केलेला उल्लेख, विजयाताई रहाटकर यांचा उल्लेख त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हुरुप आणणारा होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेच्या वेळी गर्दी जमवताना भाजपची दमछाक झाल्याचे बघायला मिळाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या सभेला ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती रहावी यासाठी भाजप नेत्यांनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येत होते. निमित्ताने भाजपने शहरभर केलेल्या वातावरण निर्मितीमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप कमळ चिन्हावर लढवेल, ही शक्यता वाढल्याचा दावा केला जात आहे.