भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपातर्फे संजीव नाईक यांनी उमेदवार म्हणून मीरा भाईंदर शहरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. सध्या ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील शिवसेनेला (शिंदे गट) विरोध केला असून नाईक यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. यामुळे महायुतीचा घटक असलेली शिवसेना कमालीची अस्वस्थ झाली आहे.

ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच शमलेला नाही. अशातच संजीव नाईक यांनी मिरा भाईंदर शहरात भाजपाचे उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेला विरोध करणार्‍या भाजपाला ही चांगली संधी मिळाली आणि यांना अघोषित पाठींबा जाहीर केला आहे. २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी संजीव नाईक यांनी या मतदार संघांचे नेतृत्व केले होते. यावरूनच आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची घोषणा संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यापुढे केली आहे. सध्या नाईक हे भाजपाच्या मदतीने जागोजागी मेळावे घेत आहे

हेही वाचा : NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका

शिवसेनाच्या उमेदवारासाठी भाजप कार्यकर्ते काम करण्यास इच्छुक नसल्याची घोषणा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केली होती. त्यामुळे नाईक यांना पाठिंबा देऊन त्यासाठी गल्लीबोळ्यात फिरून प्रचार करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. याने ठाणे लोकसभा जागेवर मीरा भाईंदर मधून भाजपचा प्रबळपणे दावा दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची देखील चर्चा आहे. संजीव नाईक यांच्या प्रचारामुळे स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना विचारणा केली असता, सध्या तरी ठाणे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाला नसल्यामुळे नरेंद्र मोदी हेच आमचे उमदेवार असून महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांकडून संभाव्य उमेदवाराला घेऊन प्रचार केला जात असल्याचे सांगितले.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेकडून विभागीय प्रचार सभा

संजीव नाईक यांच्या प्रचारामुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. परंतु थेट विरोध नको म्हणून महायुतीचा प्रचार करण्याचे धोरण पक्षाने ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन या क्षेत्रात प्रचार सुरु केला जाणार आहे. त्यानुसार बुधवारपासून शिवसेनेच्या प्रचार सभा या मिरा भाईंदर मध्ये सुरु होणार आहेत. यात दोन प्रभागाचा एक विभाग अशी रचना करण्यात आली असून शिवसैनिक नागरिकांना केलेल्या कामाची माहिती देणार आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.