ठाणे : महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला गेल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज असून यातूनच काँग्रेस कार्यालयात जाण्याची इच्छा असूनही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना तिथे जाणे शक्य होत नव्हते. अखेर शहर पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात म्हात्रे यांना यश आल्याने त्यांच्यासाठी शहर कार्यालयाचे दरवाजे खुले झाले आहेत. असे असले तरी, ग्रामीणचे पदाधिकारी मात्र अलिप्तच असून त्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला होता. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ही जागा पदरात पाडून घेत सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून काँग्रेस पदाधिकारी नाराज असून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नाराजीमुळेच ते अद्याप प्रचारात उतरलेले नाहीत. काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नीलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. तर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमदेवारी जाहीर होताच, प्रचाराला सुरुवात केली आहे. मेळावे, मतदार व नेत्यांच्या भेटी आणि पक्ष कार्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भिवंडी पूर्वतील सपाचे आमदार रईस शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष व माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची समजूत काढण्यात म्हात्रे यांना यश आले असून ताहीर हे म्हात्रे यांच्या प्रचारात उतरले आहेत. नगरसेवकांसोबत बैठका घेण्याबरोबरच मंगळवारी म्हात्रे यांना शहर कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे म्हात्रे यांच्यासाठीव शहर कार्यालयाचे दरवाजे खुले झाले आहेत. असे असले तरी भिवंडीतील काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे मात्र प्रचारापासून अलिप्तच असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : “काँग्रेस देशाची संपत्ती मुस्लिमांना देईल”, मोदींचा आरोप; जाहीरनामा काय सांगतो?

महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना शहर कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले असून आहे. पक्षाच्या नगरसेवकांसोबत बैठका झाल्या असून आता सर्वजण सोबत आहेत. ग्रामीणचे पदाधिकारी लवकर सोबत येतील.

रशीद ताहीर मोमीन (काँग्रेस शहर अध्यक्ष, भिवंडी)