बिहारमध्ये राजकीय संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. भाजपा-जेडी(यू) युतीमध्ये गोंधळाची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आरजेडी आणि जेडी(यू) यांनी सोमवारी पाटणा येथे त्यांच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या. एनडीएचा घटक असलेला हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर)ही आपल्या आमदारांची बैठक घेत आहे.

हेही वाचा- तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी तुरूंगात अस्वस्थ, टॉयलेटमध्येच घालवली पहीली रात्र

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतर हे भेटींचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी जेडी(यु)  ने नितीश सरकारच्या विरोधातील षड्यंत्रामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भविष्यातील निवडणुकांसाठी दोघांमधील युतीबाबत काहीही अंतिम नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते.

जेडी(यू) मधील सूत्रांनी सांगितले की, त्यांचे सर्व ४५ आमदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुखमंत्र्यांना भेटणार आहेत. तर दुस-या बाजुला तेजस्वी यादव यांनी बोलवलेल्या मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आरजेडीने आपल्या सर्व ७९ आमदारांना सोमवारी रात्री पाटण्यात येण्याचे आदेश दिले आहेत. या राजकीय परिस्थीतीत जेडी(यू) आणि आरजेडीने यांनी शांत राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंकडून वाद होऊ नये याची काळजी घेतली जातेय. बिहारमध्ये एका कार्यक्रमात राजकीय सौहार्दाचा एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला होता.  या कार्यक्रमात नितीश कुमार हे विरोधी पक्षनेते तेजस्वी यांना इफ्तार पार्टीनंतर मुख्यमंत्री निवस्थानाच्या गेटपर्यंत सोडायला आले होते.

जेडी(यु)चे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी  पत्रकार परिषदेत पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार नाही असे सांगितले आहे.त्यासोबतच आरसीपी सिंग प्रकरणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपसोबत जेडी(यू) चे संबंध अनेकवेळा ताणले जात आहेत.  बिहारला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी सतत नाकारणे यांसारख्या मुद्द्यांवरून या दोन मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण होत आहे.

विधानसभेच्या शताब्दी सोहळ्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या निमंत्रणांमध्ये नितीश यांचे नाव नसणे हेही जेडी(यु)ची नाराजी वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.पाटणा येथे झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय बैठकीला जेडी(यु) ने गांभीर्याने घेतले आहे. विशेषतः या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची नितीशकुमार यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.  भाजपाने २०२४ च्या लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडी(यु)सोबत जाण्याबाबत अजूनही काही ठोस भूमिका घेतली नाही आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये राजकीय संभ्रमावस्था वाढतेय असंच म्हणावे लागेल.