छत्रपती संभाजीनगर: रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र ‘ पैठण ’ येथे पंचायत समितीमध्ये ‘ जनता दरबार’ घेतात. त्यांच्या या उपक्रमास कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊ नये. असे कोणी केल्यास त्यांचे छायाचित्रण करुन पाठवा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गट आक्रमक असेल,असा संदेश दिला.

‘पैठणच्या आमदारांनी आता राजीनामा दिला आहे. तसेच जालन्याचे खासदार आता काँग्रेसचे कल्याण काळे आहेत. त्यामुळे पैठणच्या अधिकाऱ्यांनी अन्य कोणाच्या जनता दरबारास हजेरी लावू नये. कोणी अधिकारी अशा उपक्रमात हजेरी लावत असेल तर त्यांचे छायाचित्रण करा आणि ते माझ्याकडे पाठवा. त्या अधिकाऱ्याची तक्रार करायची किंवा त्यांना काय करायचे ते मी ठरवेन असे दानवे म्हणाले.पैठण मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत. त्यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचे मंत्री पद कायम आहे. आचारसंहितेपर्यंत मंत्री पद कायम रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली होती. त्यांचे मंत्री पद कायम आहे. मात्र, मंत्री भुमरे यांचे सूपूत्र विलास भुमरे हे जनता दरबार घेतात अशा तक्रारी कायम आहेत. त्यांना असे करण्याचा अधिकार नाही, असाही ठाकरे गटाचा दावा आहे.

हेही वाचा : अपयशाचा शिक्का पुण्यातून पुसून काढण्याचा भाजपचा चंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ‘ गद्दारांना गाढा’ असे घोषवाक्य हाती घेत संघटनात्मक वाढीचा कार्यक्रम सुरू केला होता. सुदाम शिसोदे यांचाही ठाकरे गटात नुकताच प्रवेश झाला. तत्पूर्वी दत्ता गोर्डे यांनाही शिवसेनेच्या ठाकरे गटात घेण्यात आले. मद्यविक्रेता अशी प्रतिमा करुन संदीपान भुमरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने प्रचार केला होता. मात्र, प्रतिमा मलीन करुनही लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याचे उद्धव ठाकरे यांनीही नुकतेच मेळाव्यात म्हटले होते. ज्या मतदारसंघातून आमदार फुटले अशा ठिकाणी नवीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.