धुळे: महायुतीच्या वतीने भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेले खासदार डाॅ. सुभाष भामरे यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण होत आली असतानाही धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अजूनही चाचपडत आहे. काँग्रेसकडून पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांची नावे चर्चेत होती. ही नावे आता मागे पडली असून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव पुढे आले आहे. धुळे लोकसभा मतदार संघात भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांचेच उमेदवार जाहीर झाले असून एमआयएम किंवा महाविकास आघाडीकडून काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस धुळे जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेचा लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरात लवकर उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, प्रत्यक्षात तसे झालेले नाही. काँग्रेसला अजूनही योग्य उमेदवार सापडलेला नाही.

हेही वाचा : काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?

धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, मागील तीन निवडणुकांपासून मतदार संघावर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसतर्फे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांचे नाव पुढे आले होते. आमदार पाटील यांनी अश्विनी पाटील यांच्या उमेदवारीबाबतही नकार दिल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांची नावे चर्चेत आली होती. संबंधित इच्छुकांनी जोरदारपणे पाठपुरावा न केल्याने ही नावेही मागे पडून आता माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत आले आहे. डाॅ. बच्छाव या उमेदवारी करण्यासाठी तयार आहेत.

हेही वाचा : पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर

धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्यातीलच मतदारसंघांचा विचार करण्यात आला असला तरी या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा विचार केल्यास तीन मतदारसंघांची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल, असा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील डाॅ. शोभा बच्छाव यांच्या नावावर चर्चा सुरु झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस अधिकारी अब्दुर रहमान यांना उमेदवारी दिली आहे. वंचितच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यातच उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत असल्याने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही शांत आहेत.

हेही वाचा : मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटली असून पक्षातर्फे निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात येईल. उमेदवारीसंदर्भात परस्पर दावा करण्याला काहीही अर्थ नाही.

-श्यामकांत सनेर (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, धुळे)