नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर चव्हाट्यावर आले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जिवा पांडू गावित यांनी अर्ज दाखल करुन महाविकास आघाडीला धक्का दिला. तर महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना भाजपसह मित्रपक्षातील नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. संघटनेच्या कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी डॉ. पवार यांचा समन्वय नसल्याची तोफ डागत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

माकपने दिंडोरीत गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल करुन महाविकास आघाडीवर दबाव तंत्राचा प्रयोग केला आहे. मोठे मन दाखवून राष्ट्रवादीने आपला उमेदवार रिंगणात उतरवू नये. अजून वेळ गेलेली नाही. या जागेवर तडजोड करावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नसल्याचे सुतोवाच माकपकडून करण्यात आले. प्रारंभी माकपने उमेदवार न देण्याचे मान्य केले होते. पण, नंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाल्यामुळे आघाडीतील बेबनाव उघड झाला. माकपच्या उमेदवारीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या ठिकाणी माकपची एक ते सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. प्रत्येक निवडणुकीत ती एकगठ्ठा स्वरुपात माकपला मिळत असल्याचा इतिहास आहे. माकपची उमेदवारी म्हणजे महाविकास आघाडीतील दुफळी नसल्याचा दावा डॉ. अशोक ढवळे करतात. महाराष्ट्रात या एकमेव जागेसाठी आम्ही आग्रही होतो. या ठिकाणी पक्षाची ताकद आहे. गावितांनी आदिवासी बांधव, कांदा उत्पादकांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. अजून वेळ गेलेली नसल्याचे सांगत राष्ट्रवादीने नवखा उमेदवार दिला असल्याकडे माकपच्या नेत्यांकडून लक्ष वेधले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. माकप देशात इंडिया व राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. दिंडोरीत त्यांनी माघार घ्यावी, यासाठी पुन्हा विनंती केली जाईल, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी म्हटले आहे. प्रचाराच्या धामधुमीत महाविकास आघाडीत फाटाफूट होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, महायुतीतही सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. नांदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात नाराजी असल्याचे डॉ. भारती पवार यांना स्पष्टपणे सांगितले. परंतु नाराजी व्यक्त करण्याची ही वेळ नाही. तुम्हाला मताधिक्य मिळवून देऊ, मग आमची नाराजी बोलून दाखवू, असे त्यांनी नमूद केले. मित्रपक्षच नव्हे तर, भाजपमधील पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. डॉ. पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. उमेदवारी जाहीर होण्याआधी दिंडोरीचे प्रभारी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ. पवार यांच्याविषयी मते जाणून घेतली होती. तेव्हा बहुतांश पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तथापि, चुकीचा अहवाल देऊन वरिष्ठांनी डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष बर्डे यांनी उमेदवारास वेठीस धरण्याचे काम केले. पक्षविरोधी भूमिका घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत बर्डे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी म्हटले आहे.