कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा की शिवसेनेचा उमेदवार हा पेच आता संपुष्टात आला आहे. शाहूवाही तालुक्यात प्रभाव असलेल्या सरुडकर घराण्यातील व पन्हाळ्याचे माजी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल सोपवून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आव्हान कायम ठेवले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. मात्र ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणुकीला उभे राहावे अशी अट घातली होती. ती शेट्टी यांना मान्य नव्हती. त्यामुळे मातोश्री आणि शेट्टी यांचे बिनसले.

याचवेळी शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व हातकणंगलेचे माजी आमदार डॉच सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर आज ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती उमेदवारीची मशाल देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : “आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

कोण आहेत सत्यजित पाटील?

शाहूवाडी तालुक्यात सरूडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बाबासाहेब पाटील सरूडकर हे या मतदारसंघात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांचा पराभव केला होता. . बाबासाहेब पाटील सरूडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे गेली २५ वर्षे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय वारसा सत्यजित पाटील सरूडकर हे चालवत आहेत .त्यांनी सर्वप्रथम मानसिंग गायकवाड व करण गायकवाड यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांचा पराभव केला होता. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली असताना ठाकरे यांनी त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे.