दयानंद लिपारे

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतील अनेक प्रमुखांनी पाठिंबा दिल्याने या गटाचे वर्चस्व वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारपासून कोल्हापूर जिल्हा दौरा सुरू होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व नेते ठाकरेंपासून दुरावल्याने पक्ष निस्तेज होत असल्याचे राजकीय चित्र आहे. शिवसेना पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी वेळोवेळी शक्ती प्रदर्शन करत ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांना नेत्यांचा आधार हवा असून आदित्य ठाकरे तो देण्यात यशस्वी ठरतात का याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा… सोलापुरात काँग्रेसची बुडती नौका वाचवताना प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाचा कस

हेही वाचा… संजय राऊत : भाजपच्या दृष्टीने युतीची नाळ तोडणारा खलनायक गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेत चैतन्य जागवण्यासाठी आदित्य ठाकरे सोमवारी प्रथम आजरा येथे सभा घेणार आहेत. आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात ठाकरेंची तोफ सभेत धडाडण्याची शक्यता आहे. ते दुपारी कोल्हापुरात येणार आहेत. शहर शिवसेना समन्वयक हर्षल सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मिरजकर तिकटी येथे होणार आहे. येथे होणाऱ्या सभेत ते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा समाचार घेतील, अशी शक्यता आहे. मंगळवारी ते जयसिंगपूर येथे सभा घेणार आहेत. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र डागतील असा अंदाज आहे.