प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : लातूरच्या जिल्ह्यातील पहिल्याच वार्षिक आराखड्याच्या बैठकीत माजीमंत्री अमित देशमुख यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले. खरे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही उणीदुणीही त्यांनी काढली. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस तसेच त्याचा डावा- उजवा हात असे म्हणत अमित देशमुख यांनी पालकमंत्र्यांशी पहिल्याच बैठकीत सूर जुळवून घेतले.

हेही वाचा… ‘मी पण चालणार’च्या प्रसारासाठी अशोक चव्हाणांचा चालण्याचा सराव!

लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .नव्या सरकारची ही पहिलीच बैठक, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीस उपस्थित होते शिवाय दोन खासदारही होते. या बैठकीत गिरीश महाजनांनी अतिशय तडफेने मांडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी बैठकीतूनच दूरध्वनी करून प्रश्न सोडवले. विजेच्या रोहित्राचा प्रश्न असेल, रोहित्राला लागणारे ऑईल, जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नामध्ये स्वतः त्यांनी लक्ष घातले .लातूर -टेंभुर्णी हा रस्ता गेल्या ३० वर्षापासून रखडलेला आहे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सर्वच आमदार खासदारांनी आपले म्हणणे मांडले .तोही विषय आपण नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावू, लातूर शहरात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी सुरू आहे तेही प्रश्न मार्गी लावले जातील असे महाजन यांनी सांगितले. त्यानंतर अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात आमच्या काळात म्हणजे अमित देशमुख हे माजी पालकमंत्री होते व त्यापूर्वी संभाजी पाटील निलंगेकर हेही पालकमंत्री होते. नियोजन समितीच्या बैठका या वादळी होत असत आता आजच्या बैठकीत अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. त्यामुळेच वादळ थोपवणारे नेतृत्व महाजनांचे आहे, या शब्दात त्यांनी तोंडभरून कौतुक केले. देशमुख म्हणाले माझ्या कानात संभाजी पाटील निलंगेकर यांनी गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे डावे व उजवे दोन्हीही हात आहेत असे सांगितले. त्यामुळे आता आमच्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागण्यात कुठलीच अडचण येणार नाही महाजनांनी स्वतः लक्ष घालून सर्व प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा… लोकसभेच्या तयारीसाठी डॉ.कराड यांच्याकडून मिश्र दळणवळणाचे इंजिन

गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय ढिलाई होती, लोकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत ,फोनवरचे कारभार चालला, क्रीडा संकुल व अन्य खरेदीत कमालीचा भ्रष्टाचार झाला अशी थेट टीका केली..आताच्या सरकारमध्ये कुठलीही ढिलाई चालणार नाही या शब्दात दम दिला .अधिकाऱ्यांना आपण निलंबित केले आहे, अधिकारी निलंबित करण्याची आपल्याला हौस नाही मात्र त्यांनी काळजी घेऊन वागले पाहिजे असेही ते म्हणाले . महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर महाजनांनी टीका केलेली असतानाही त्यावर कसलीही टिप्पणी न करता आमदार अमित देशमुख यांनी महाजनांचे तोंड भरून कौतुक केले, याबद्दलही देशमुख यांच्या दिलदारपणाची चांगली चर्चा रंगते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In latur politics amit deshmukh adjusted with guardian minister girish mahajan print politics news asj
First published on: 04-11-2022 at 14:32 IST