छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण, असा पेच निर्माण झाला आहे. जालना लोकसभा निवडणूक लढविताना उमेदवाराचा शोध काँग्रेसमध्ये ऐनवेळी घेतला जातो, हा जुना प्रघात अजूनही सुरूच आहे आणि लातूरचे इच्छूक उमेदवार अमित देशमुख यांच्याकडून कोणाच्या नावाला पसंती या संभ्रमात आहेत. त्यामुळे पडझडीनंतर काँग्रेसची उसवलेली वीण सांधण्यासाठी नेतृत्व प्रयत्न करणार का, याची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवतात आणि आता या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

अशोक चव्हाण यांच्याबरोबर हिंगोलीतून निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारे डॉ. अंकुश देवसरकर हेही भाजपवासी झाले. त्यामुळे हिंगोलीतील उमेदवाराचा शोध सुरू आहे. ही जागा काँग्रेसपेक्षा शरद पवार यांची राष्ट्रवादी अधिक सक्षमपणे मैदानात उतरू शकेल, असा दावा केला जात आहे. या मतदारसंघातून जयप्रकाश दांडेगावकर निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा संख्यात्मक स्तरावर सुटला असला असे सांगितले जात असले तरी मतदारसंघनिहाय उमेदवार ठरलेले नाहीत. त्यामुळे पेच कायम आहेत.

हेही वाचा : तब्बल २५ वर्षांनंतर मनोमिलन; विदेशातील नोकरी सोडून ‘तो’ आला बीजेडीमध्ये!

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोघांची नावे चर्चेत येतात. कल्याण काळे आणि विलास औताडे यांनी ही निवडणूक पूर्वी लढून पाहिली होती. या दोघांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. कल्याण काळे यांनी चांगली लढत दिली होती. मात्र, जालना लोकसभा मतदारसंघात सातत्याने चांगली बांधणी करणारा काँग्रेसचा नेता नसल्यामुळे उमेदवारीचे पेच कायम आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी काही नावे चर्चेत आणली जात आहेत. पण अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्यामुळे त्यांची पोकळी तातडीने भरून काढता येईल, असा चेहरा काँग्रेसकडे तूर्तास दिसत नसल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हुूरूप आला आहे.

हेही वाचा : ‘राहुल यात्रा’ आज गुजरातमध्ये दाखल; मरणासन्न काँग्रेसला संजीवनी मिळणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुलनेने मराठवाड्यात आता काँग्रेसची ताकद केवळ लातूर जिल्ह्यात दिसून येते. अमित देशमुख यांच्याकडे या जिल्ह्याचे नेतृत्व आहे. लोकसभा निवडणुकीत ते ज्यांना म्हणतील त्यांनाच तिकीट दिले जाईल. अलिकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी लातूर येथे विशेष मेळावाही घेतला. त्यानंतर उत्साह निर्माण होण्याऐवजी मरगळच असल्याचे दिसून येत आहे. संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना काम न देता आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अजूनही सामसूम आहे. दरम्यान औसा विधानसभेत पकड असणारे माजी आमदार बसवराज पाटील यांनीही अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश घेतला. अशा स्थितीमध्ये सतत पराभूत होणाऱ्या काँग्रेसच्या जागांवर उद्धव ठाकरे गटानेही दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. जालना लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार असेल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.