पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विकासकामांचे उद्घाटन करत वातावरणनिर्मिती केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आढावा बैठक घेत लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी सरसावल्या आहेत, तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांमध्ये ‘ठेकेदारभेटी’च्या आरोपामुळे जुंपली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांची साथ सोडून कमळ हातात घेतले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. महापालिकेवर भाजपची सत्ता आणली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शहरातील पक्ष संघटना, आमदार, माजी आमदार, बहुतांश माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले. दोन्ही गटांनी पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्याला अटक; ममता बॅनर्जींच्या पक्षाचे अटकेला समर्थन, यामागे नेमकं कारण काय?

पक्ष, चिन्ह गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शहरात होते. आढावा बैठक घेतली. संघटना मजबूत करा, शहरातून शरद पवार यांना ताकद द्यावी, असे आवाहन केले. तसेच पक्षातील वाढत्या गटबाजीवर नाराजी व्यक्त केली. शहराध्यक्ष तुषार कामठे आणि युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्यात तीव्र मतभेद दिसून येतात. पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनातही ही फूट दिसली. हा धागा पकडून गटबाजी संपविली पाहिजे. पक्षाने एकदा निर्णय घेतला, की त्याच्या पाठीशी उभे राहावे, सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

हेही वाचा : बीड मतदारसंघ: भाजपकडून दोघींपैकी कोण की तिसराच? 

आरोप-प्रत्यारोप

शहराध्यक्ष कामठे हे थेट आक्रमकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला करत आहेत. उपमुख्यमंत्री पवार सकाळी लवकर उठून ठेकेदारांना भेटतात. त्यांची, त्यांच्या पक्षाच्या लोकांचीच कामे करतात, असा आराेप केला हाेता. कामठे यांचा आरोप अजित पवार यांना जिव्हारी लागला. शहर दौऱ्यावर असताना पवार यांनी नाव न घेता कामठे यांच्यावर हल्लाबोल केला. विकास आणि काम हे माझे धाेरण आहे. अधिकाऱ्यांना बराेबर घेऊन पहाटे सहापासून मी कामाला सुरुवात करताे. माझ्याबरोबर ठेकेदार असतात, हे तुझ्या वडिलांनी पाहिले का? काहीही बडबडायचे, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार सुरू आहे. याला किंमत द्यायला नको, असले किती आले आणि गेले, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा नवा प्रयोग, जाट समाजाच्या मतांसाठी आरएलडीशी युती? वाचा नेमकी रणनीती काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याला कामठे यांनीही तत्काळ उत्तर दिले. दादा, तुम्ही इतके का चिडलात? सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता नि:स्वार्थी भूमिका घेऊ शकतो, हे आपणाला आवडले नसेल हे मान्य आहे. पण तुम्ही सामान्य कार्यकर्त्याच्या वडिलांचा उल्लेख करणे नक्कीच स्वागतार्ह नाही. यावरून आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.