बिपीन देशपांडे ,लोकसत्ता छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघातील सध्याचे चित्र निश्चितेतील अनिश्चितता, असे संभ्रमाच्या गर्तेत टाकणारे आहे. महायुतीतून उमेदवारी कोणाला? प्रीतम की पंकजाताई याची चर्चा सुरू आहे. काही प्रश्न महाविकास आघाडीसमोरही आहेत. त्यांच्याकडे जागा कोणाला सोडायची. तुल्यबळ लढत देणारा चेहरा कोण? हे प्रश्न विरोधकांच्या आघाडीपुढे आहेत. बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जाते. ऐन मतदानावेळी तर संघर्ष टिपेला पोहोचलेला असतो. अगदी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे लोकसभा लढवत असतानाही त्याची प्रचीती आलेली आहे. त्यात आता राज्यातील मराठा-ओबीसींमधील आरक्षणाच्या आंदोलनांनी संभाव्य लढतीमध्ये अधिक टोकदारपणा येईल, हे निश्चित मानले जात आहे. दोन्ही घटकांमध्ये एकीचे बळ वाढले आहे. असे असले तरी महायुतीकडून लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतमताई मुंडेच राहतील आणि त्यांना देशातून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्याचा गजर अलीकडेच पार पडलेल्या समन्वय मेळाव्यातून करण्यात आलेला आहे. म्हणजे भाजपकडून उमेदवार ओबीसी असणार, हे निश्चित पण कोण हे अजून अनिश्चित. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या प्रा. सुशीला मोराळे यांचे नाव सध्या चर्चेत असतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य असलेले शरद पवार गटातील डॉ. नरेंद्र काळे हे काम करत आहेत. आपण समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते, यांचे नातू असून, त्यांचे विचार पुढे नेत असल्याचे ते आवर्जून सांगतात. हेही वाचा >>> उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा नवा प्रयोग, जाट समाजाच्या मतांसाठी आरएलडीशी युती? वाचा नेमकी रणनीती काय? डॉ. काळे यांच्या रूपाने महाविकास आघाडीकडे मराठा चेहरा असला तरी लोकसभा निवडणुकीतील जातीय गणिते पाहता त्यांची उमेदवारी महायुतीच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता अधिक. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी व त्यांच्या पक्षातील व भाजपतील मराठा नेत्यांची तगडी फौज, जनाधार आपल्या मागे वळवण्यामागे वाकबगार असलेले मंत्री धनंजय मुंडे आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणून आश्वासित करून एकवटून ठेवलेला ओबीसी पाहता महायुतीच्या उमेदवारापुढे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागेल असे चित्र आहे. राष्ट्रवादी वगळता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेसकडे तसा उमेदवार नाही. मात्र, ओबीसी आणि त्यातही महिला उमेदवार दिला तर लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. पण कोण, असा प्रश्न असून अनपेक्षितपणे मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला तर मात्र, राज्यसभा सदस्य आणि दिल्लीतील गांधी घराण्याच्या निष्ठावंत मानल्या गेलेल्या रजनी पाटील यांचे नाव समोर येते. पण त्या निवडणुकीत उतरतील का, असाही एक प्रश्न आहे. हेही वाचा >>> हरियाणात काँग्रेसचे प्रमुख चेहरे लोकसभा यादीतून गायब; १० जागांसाठी काँग्रेसचे २९९ उमेदवार इच्छुक पंकजा मुंडे यांच्या विविध वक्तव्यांमुळे भाजपवर नाराज असणार एक वर्ग बीड लोकसभा मतदारसंघात तयार झाला होता. मराठा- ओबीसी संघर्षानंतर हा समाज डॉ. प्रीतम मुंडे किंवा भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील का, ही शंका वारंवार घेतली जाते. समन्वयाच्या बैठकीत गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र विसरण्यापासून ते अनेक वक्तव्यांमुळे नाराज मतदारासमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पर्याय उभा करणे अवघड असल्याचेच चित्र सध्या दिसून येत आहे. २०१९ चित्र प्रीतम गोपीनाथराव मुंडे (भाजप) ६, ७८, १७५ बजरंग मनोहर सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)५, ०९, ८०७