संतोष प्रधान

मुंबई काँग्रेसचा कोणताही दिल्लीतील नेता मुंबईत दाखल झाला की त्याचे विमानतळावर स्वागत करायला कृपाशंकर सिंह आवर्जुन उपस्थित असायचे. नेते मंडळींचे स्वागत करता करता ते केंद्रीय नेत्यांच्या अगदी जवळ पोहचले. गृहराज्यमंत्री हे महत्त्वाचे पदही भूषविले. मात्र नंतर काँग्रेसमध्ये महत्त्व कमी होत गेले. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झाली. त्यातूनही सहीसलामत बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले कृपाशंकर नंतर भाजपावासी झाले. आता भाजपमध्ये ते आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

गेल्याच आठवड्यात फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीला भेट दिली. या भेटीत त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घेतले. दोन दिवसांच्या या भेटीत फडणवीस अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. फडणवीस यांच्या या वाराणसी भेटीत कृपाशंकर सिंह हे दोन दिवस सावलीसारखे त्यांच्या बरोबर होते. वाराणसी भेटीत फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांना बरोबर घेतले होते. वाराणसी भेटीबद्दल फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटमध्ये कृपाशंकर सिंह यांचा उल्लेख करण्यात आला होता.

भाजपावासी झाल्यापासून कृपाशंकर सिंह हे नेहमी फडणवीस यांच्या बरोबर असतात. रविवारी झालेल्या पक्षाच्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात कृपाशंकर सिंह हे फडणवीस यांच्याबरोबर पहिल्या रांगेत बसले होते. काँग्रेसमध्ये असताना कृपाशंकर सिंह हे पक्षातील नेत्यांच्या अगदी निकट असत. दिल्लीतील नेत्यांच्या निकटवर्तीयांमध्ये असल्यानेच सिंह यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. नंतर विधानसभेवर निवडून आल्यावर विलासराव देशमुख मंत्रिमंडळात त्यांची गृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसमधील हिंदी भाषकांचा चेहरा होते. पक्षाने त्यांना ताकद दिली. त्या काळात हिंदी भाषक मुंबईत काँग्रेसला मतदान करीत असत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. भाजपाला मुंबईत हिंदी भाषकांमध्ये चांगली पकड असलेल्या नेत्याची गरज होतीच. पण तेव्हा भाजपा-शिवसेना युती झाल्याने भाजपाने कृपाशंकर यांना लगेचच पक्षात महत्त्व दिले नाही. शिवसेना- भाजपा युती तुटल्यावर भाजापने कृपाशंकर यांना भाजपामध्ये दाखल करून घेतले. काँग्रेसमध्ये शिर्षस्थ नेत्यांना चिकटणारे कृपाशंकर आता भाजपामध्येही शिर्षस्थ नेत्यांच्या अवतीभवती दिसू लागले आहे.