अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पणाला लागणार आहे. त्या दृष्टीने भाजपने अगोदरपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली. स्थानिक निवडणुकांसाठी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचलेला असणे गरजेचे असते. त्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांपुढे अकोला शहरात संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान राहील. या अगोदर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकतर्फी यश मिळवले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘अकोला पूर्व’मध्ये भाजप, तर ‘अकोला पश्चिम’मध्ये काँग्रेसचे पारडे जड ठरले. आता तेच समीकरण कायम राहणार की बदलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्ष, पदाधिकारी व इच्छूक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष आहे. कार्यकाळ संपून तीन वर्षांचा कालावधी झाला तरी अकोला महापालिकेची निवडणूक झाली नाही. अकोला महापालिकेची स्थापना २००१ मध्ये झाली. भाजपची तब्बल साडेबारा वर्ष, तर काँग्रेसची पाच वर्ष सत्ता महापालिकेत राहिली. काँग्रेससह आघाडीतील इतर घटक पक्षांच्या मदतीने अडीच वर्ष वंचित आघाडीने देखील महापालिकेतील सत्तेचा लाभ घेतला.
अकोल्यात महापालिका स्थापन होऊन अडीच दशकांचा कालावधी झाला तरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अकोला महापालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. त्याचा परिणाम शहरातील विकास कार्यावर दिसून आला. गेल्या दशकभरात अकोला शहरातील विकासासाठी कोट्यवधींचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला. शहरात तीन उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग तयार झाला. शहरातील सिमेंटकाँक्रेटचे रस्ते, अमृत योजनांतर्गत कामे, घरकुलांसह हद्दवाढ भागातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. भाजपसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. मात्र, विकास कामांच्या निकृष्ट दर्जामुळे चौफेर टीका देखील होते. शहरात मालमत्ता करवाढ प्रचंड प्रमाणात झाल्याने महापालिका निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. पाच वर्ष भाजपच्या सत्तेनंतर तीन वर्षांपासून प्रशासकांचा कार्यकाळ सुरू आहे. आता आगामी निवडणुकीत पुन्हा झेंडा फडकविण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी भाजपने गेल्या काही वर्षांपासून तयारी सुरू केली. अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये अकोला महापालिकेचे कार्यक्षेत्र आहे. तब्बल २९ वर्षांपासून पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला काँग्रेसकडून पराभवाचा मोठा धक्का बसला. महापालिका निवडणुकीत भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
अकोला पूर्वमध्ये वर्चस्व कायम राखत भाजपचे रणधीर सावरकर यांनी ५० हजारावर मताधिक्य मिळवले. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघातील शहरी भाग भाजपसाठी पोषक ठरण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दोन्ही गट, मनसेकडून देखील तयारी सुरू केल्या गेली. या सर्वच पक्षांना प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणी करावी लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या
विधानसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’ चा भाजपचा बालेकिल्ला ढासळला. दुसरीकडे साजिदखान पठाण यांच्या विजयाने काँग्रेसचे मनोबल वाढले. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील.
२०१७ च्या निवडणुकीतील संख्याबळ
भाजप – ४८
काँग्रेस – १३
शिवसेना – ०८
राष्ट्रवादी – ०५
वंचित – ०३
एआयएमआयएम – ०१
अपक्ष – ०२
एकूण – ८०