मुंबई : अयोध्येतील भव्य श्रीराममंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण करू नये आणि राजकीय नेते म्हणून नव्हे, तर रामभक्त म्हणून त्यात सहभागी व्हावे, असे सक्त निर्देश भाजप पक्षश्रेष्ठींनी नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या सोहळ्यानिमित्ताने राज्यासह देशभरात उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मंदिरे, मैदाने किंवा अन्यत्र श्रीराममूर्तींच्या मिरवणुका, शोभायात्रा, अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती, रामलीला, रामायण, गीतरामायण, भजन, होमहवन, महाआरती, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन आणि प्रसिद्धी करताना नेत्यांचे मोठे कटआऊट लावून किंवा भाजपतर्फे पक्ष म्हणून हा कार्यक्रम आयोजित करू नये. तर वैयक्तिक पातळीवर आणि रामभक्त या नात्याने आयोजन व प्रसिद्धी करावी, असे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत.

हेही वाचा – रामजन्मभूमीचा स्वातंत्र्यपूर्व काळातील रक्तरंजित इतिहास

राम मंदिराचे लोकार्पण हा रामजन्मभूमी न्यासाचा कार्यक्रम नसून भाजप आणि रा. स्व. संघाचा कार्यक्रम असल्याची टीका काँग्रेससह अन्य विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपकडून या जल्लोषाचे राजकारण न करण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. धार्मिक पद्धतीने आणि वैयक्तिक पातळीवर हे कार्यक्रम व्हावेत व जल्लोष साजरा केला जावा, अशा पक्षश्रेष्ठींच्या सूचना आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कोराडी-नागपूर येथे सहा हजार किलो हलवा महाप्रसाद व अन्य कार्यक्रमांचे आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून न करता रामभक्त या नात्याने केले आहे. हा हलवा प्रसाद सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते सोमवारी केला जाणार आहे.

Ram Mandir inauguration

हेही वाचा – आधी अमित शाहांविरोधात लढवली निवडणूक, आता थेट भाजपात प्रवेश, गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का!

भाजप नेत्यांना राजकीय पद्धतीने किंवा पक्ष म्हणून कार्यक्रमांचे आयोजन न करण्याच्या सूचना असल्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे मात्र मोठ्या प्रमाणावर नेत्यांचे भव्य कटआऊट, फलकबाजी करून प्रसिद्धी करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्यासाठी एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे व अन्य नेत्यांचे भव्य कटआऊट किंवा फलकांवर मोठी छायाचित्रे लावण्यात आली आहेत.