महेश सरलष्कर

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता भलतेच रंग भरू लागले आहेत. पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेसमध्ये ठराव संमत केला जाण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष, कार्यकारिणी समिती तसेच, पक्षाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात येतील. प्रदेश काँग्रेसमधील हे ठराव पक्षातील सूत्रे गांधी कुटुंब व त्यांच्या निष्ठावानांकडे कायम ठेवण्यासाठी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, या संभाव्य ठरावांचा आगामी पक्षाध्यक्ष निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा पक्षाचे निवडणूक विभाग प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसमधील ठराव नव्या पक्षाध्यक्षासाठी लागू होतील. नवा पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व कार्यकारिणी समितीच्या सदस्यांसंदर्भात निर्णय घेऊ शकतील, असे मिस्त्री यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… रायगडातील बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरून राजकारण तापणार; स्थानिकांच्या विरोधाचा मुद्दा करत भाजपचा प्रकल्प विरोध

प्रदेश काँग्रेसच्या ठरावामुळे सोनिया गांधींना सर्वाधिकार दिले गेले तरी, पक्षाध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक स्थगित होणार नाही. २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल. २४ ते ३० सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज भरले जातील. त्यानंतर आठ दिवसांमध्ये अर्ज मागे घेता येतील व १७ ऑक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष पदासाठी मतदान होईल, अशी माहिती मिस्त्री यांनी दिली. काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ९ हजारहून अधिक ‘’मतदार’’ मतदान करू शकतात.

हेही वाचा… आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे शिवसेनेची बालेकिल्ल्यातील पडझड थांबणार?

काँग्रेस अंतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शशी थरुर यांच्यासह पाच काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता व त्यासंदर्भात मिस्त्री यांना पत्रही दिले होते. मात्र, २० सप्टेंबरनंतर संभाव्य उमेदवाराला ‘’मतदारां’’ची यादी पाहता येऊ शकेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्या-राज्यातील दहा काँग्रेस मतदारांचे अनुमोदन गरजेचे असेल. त्यासाठी ही यादी उपलब्ध करून दिली जाईल, असे मिस्त्री यांनी सांगितले. मात्र, प्रत्येक राज्यात काँग्रेसचे किती मतदार आहे, त्याची आकडेवारी देण्यास त्यांनी नकार दिला!

हेही वाचा… दिल्लीतील बदल पुण्यातही करण्याचा ‘आप’ला विश्वास

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोर गटातील शशी थरूर वा मनीष तिवारी यांच्यापैकी कोणीही गांधी निष्ठावान उमेदवाराला आव्हान देऊ शकतो. निवडणुकीच्या प्रक्रियेवर अविश्वास दाखवून या निवडणुकीला न्यायालयातही आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर कदाचित काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाची निवडणुकीत अडचणीत येऊ शकते. काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतो. त्याचे राजकीय भांडवल भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्ष पदातील संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेसमध्ये ठराव मंजूर करून घेतले जाणार असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

प्रदेश काँग्रेसच्या ठरावामध्ये सोनिया गांधींना सर्वाधिकार दिले गेले तर, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मान राखून ऐनवेळी सोनिया गांधी एकट्याच पक्षाध्यक्षपदाचा अर्ज भरू शकतील. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर, काँग्रेसमध्ये बंडखोरही त्यांना आव्हान देण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकेल व त्यांची बिनविरोध निवड होऊ शकेल. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार नाही. त्यांच्या आग्रहामुळे सोनिया वा प्रियंका गांधी यांनीही पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला तर, गांधी निष्ठावानांपैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची गळ घालण्यात आली असली तरी, त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गांधी निष्ठावानांपैकी कोणी योग्य उमेदवार मिळाला नाही तर, अखेरच्या क्षणी सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाध्यक्षपद कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाध्यक्ष निवडीचे अधिकार देण्याचे ठराव संमत केले जाणार असल्याचे सांगितले जाते.