जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करणाऱ्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध पक्षाअंतर्गत नाराजी अजूनही कायम असल्याचे एका चित्रफितीमुळे उघड झाले आहे. भाजपअंतर्गत बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाल्याने खडसे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची १९ मार्च रोजी जळगाव येथील ब्राह्मण सभागृहात बैठक झाली. बैठकीला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील काही पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे खासदार खडसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाजन यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. कार्यालयात बंददाराआड झालेल्या बैठकीत वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यासंदर्भातील चित्रफितीत मंत्री महाजन, आमदार मंगेश चव्हाण, खासदार खडसे, आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता वाघ हे दिसतात.
हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र
वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी रक्षा खडसे आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. रक्षा खडसे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे नाव वारंवार घेतात. मात्र, मंत्री महाजन यांचे नाव का घेत नाहीत, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर खासदार खडसे यांनी, त, मी नाथाभाऊंचे नाव घेतेच. मात्र, गिरीशभाऊंचे नावही प्रत्येक भाषणात घेत असते. तुम्ही काही आरोप लावू नका, असे प्रत्युत्तर दिले. रक्षा खडसे या नेहमी भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असतात, असा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हा आरोप खडसेंनी फेटाळून लावत पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावल्याचे दिसते.
हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट
भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर, बोदवड, वरणगाव, यावल, चोपडा, जामनेर या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर सामूहिक राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले होते. बैठकीनंतर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात पक्षांतील पदाधिकाऱ्यांत नाराजी नसल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, आता वादाची चित्रफीतच समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्याने मंत्री महाजन यांनी त्यावेळी सारवासारव केल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू
जळगाव आणि रावेर लोकसभा कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाली. बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये वाद नसल्याचे सांगितले होते. रावेर लोकसभा कार्यक्षेत्रातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारकार्य करत आहेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांत नाराजी नाही, असे महाजन यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने प्रचारकार्यात सहभागी आहेत. सुकाणू समितीच्या बैठकीतील कथित चित्रफीत प्रसारित करणे हे चुकीचे आहे. चित्रफीत कोणी प्रसारित केली, हे माहिती नाही. पक्षात आमचे कोणतेही मतभेद आणि मनभेद नाहीत. – खासदार रक्षा खडसे (उमेदवार, रावेर मतदारसंघ)