जळगाव – महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागत नाही तेवढ्यातच संभाव्य जागा वाटपावरून भाजपसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे) चांगलीच जुंपली आहे. भाजपने गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व जागांवर आपला हक्क सांगिल्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. परिणामी, प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
जळगाव महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही घटक पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. प्रत्यक्षात, मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात भाजपने ५७ जागा जिंकून महापालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. तर शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले होते. कालांतराने भाजपमधील तब्बल २७ असंतुष्ट नगरसेवकांना फोडून शिवसेनेने मंत्री महाजन यांच्यासह आमदार भोळे यांना जबरदस्त चपराक दिली. ५७ पैकी फक्त ३० नगरसेवक तेवढे शिल्लक राहिल्याने बहुमत मिळूनही भाजपवर अखेरपर्यंत सत्तेपासून लांब राहण्याची वेळ आली. दरम्यान, पक्षादेश न मानणाऱ्या संबंधित २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, महापालिकेची मुदत संपली तरी याचिकेचा निकाल लागला नाही.
आता पुन्हा निवडणुकीचे वेध लागलेले असताना भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे हे जळगावमध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व ५७ जागांवर भाजप यंदाही लढणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. २७ नगरसेवक आम्हाला सोडून दुसरीकडे गेलेले असले, तरी त्या जागा आमच्याच होत्या. आणि आम्ही आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत त्या जागा लढू, असा इशारा भाजपने दिला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी भाजपचे महापालिकेतील जागा वाटपाचे सूत्र अमान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप सामंजस्याची भूमिका घेत नसेल तर आम्हालाही स्वबळावर निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा असल्याचे भंगाळे यांनी ठामपणे म्हटले आहे.