छत्रपती संभाजीनगर : जालना लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणारे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे या निर्णय कॉग्रेस पक्षाने अखेर घेतला आणि डॉ. कल्याण काळे मैदानात उतरत असल्याचे स्पष्ट झाले. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान असणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात सत्ताविरोधी मानसिकतेचा लाभ मिळू शकतो का, याची चाचपणी कल्याण काळे करत होते. तो रोष मतदानातून परावर्तीत व्हावा म्हणून त्यांनी गेल्या महिनाभरापासून जालना जिल्ह्यातील भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने येथील राजकीय लढाई ‘ लक्षवेधक’ ठरू शकते.

१९८९ पासून जालना लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात., त्याला १९९१ च्या अंकुशराव टोपे यांच्या कॉग्रेसच्या विजयाचा अपवाद वगळता १९९६ पासून या मतदारसंघात कॉग्रेसला विजय मिळालेला नाही. काॅग्रेससाठी नेहमी पडणारी जागा, असा राजकीय इतिहास असतानाही उमेदवारास अधिक काम करायला वेळ द्यावा, उमेदवारी लवकर जाहीर करावी असे कॉग्रेसच्या नेत्यांना वाटले नाही. त्यामुळे कमी वेळेत सत्ताविरोधी मतदार एकत्रित करण्याचे आव्हान कल्याण काळे यांच्यासमोर आहे. जालन्याचा प्रचार तसा खुसखुशीत अंगाने जाणारा. त्याला रावसाहेब दानवे यांच्या भाषणाची शैली कारणीभूत. एका पेक्षा एक मनोरंजक किस्से सांगणारे रावसाहेब दानवे यांचा संपर्कही दांडगा. ग्रामीण बेरकीपणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला. कोणत्या गावात रेशनवर धान्य वेळेवर पोहचले नाही. निराधार योजनेतून कोणाला ‘ पगार ’ चालू झाली. कोणात्या गावात कोणती योजना मंजूर केली असे अनेक तपशील त्यांना तोंडपाठ असतात. मध्येच गाडीतून उतरुन घोड्यावरुन रपेट मारणारे रावसाहेब, किंवा गावातल्या एखाद्या ‘म्हतारी’बरोबर गप्पा हाणत स्वप्रतिमा ‘ ग्रामीण’ राहील याची काळजी घेणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विकास कामांवर कल्याण काळे यांना बोट ठेवता येईल का, हे मतदार तपासतील. विकासाच्या मुद्दयावर रावसाहेब दानवे यांना घेरता येईल का, यावर या निवडणुकीचे निकाल लागतील, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

हेही वाचा… राम मंदिराकडे पाठ फिरवणे हे काँग्रेसचे पाप; नरेंद्र मोदींनी केलेल्या या टिकेचा काँग्रेसला फटका बसेल का? वाचा सविस्तर

कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार. त्यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा २५८७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते पराभूत झाले. मात्र, कॉग्रेस टिकवून धरण्याचे काम त्यांनी केले. डॉ. काळे हे विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक. पुढे बाळासाहेब थोरात यांनी कल्याण काळे यांच्याकडे पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड, फुलंब्री, पैठण आणि शहरातील काही भाग येतो. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील संपर्काच्या जोरावर अधिक पुढे जाता येईल , असा त्यांचा होरा आहे. रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांनाही सहकार क्षेत्राचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे गावागावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या राजकारणापासून ते गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी अनेक योजना ते तयार करत असतात. खरे तर दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या वेळी सत्ता विरोधातील रोष एकत्रित करण्यासाठी काळे आता मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे जालना लोकसभा मतदारसंघातील प्रचार या वेळी अधिक टोकदार होईल असे सांगण्यात येत आहेत.