राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी मंत्री सुनील तटकरे व जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली होती. पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्रातून सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षे पक्षाचे सरचिटणीस होते. नव्या कार्यकारिणीत त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते एकमेव उपाध्यक्ष असतील. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा : पंजाब सरकारला सहा महिने पूर्ण; भ्रष्टाचारापासून ते ऑडिओ क्लीपर्यंत ‘ही’ सहा प्रकरणं राहिली वादग्रस्त

पक्षाच्या सचिवपदी राज्यातील हेमंत टकले आणि राजेंद्र जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, दिलीप वळसे-पाटील आदींची राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे युवती काँग्रेस तर खासदार फौजिया खान यांच्याकडे महिला काँग्रेसच्या अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : ज्युनियर एनटीआर ते प्रभास; आंध्र प्रदेश, तेलंगणात ताकद वाढवण्यासाठी भाजपाला ‘स्टार पॉवर’ची मदत होणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिक हे अटकेत असल्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी मुंबईच्या नरेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत मुंबईच्या क्लाईड क्रास्टो यांचीही निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय व अन्य काहीही बाबींच्या संदर्भात उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी सल्लामसलत करण्याची सूचना करण्यात आली आहे.