कोल्हापूर : एकीकडे तुतारी वाजवायची आणि दुसरीकडे कमळा भोवती पिंगा घालायचा अशा दोन्ही डगरींवरून कागलचे नेते समरजित घाटगे जाताना दिसत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मोह सुटवत नाही आणि भाजपचे आकर्षण थांबता थांबत नाही अशा विमनस्क अवस्थेत त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यामुळे घाटगे हे नेमके कोणत्या मार्गाने जाणार असा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पडला आहे.

सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये घाटगे यांना हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या वेळी ते भाजपची साथ सोडून ते अपक्ष म्हणून लढले. मागील विधानसभा निवडणुकी वेळी त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवली. गेल्या निवडणुकीवेळी त्यांना विजयी होण्याचा पुरता विश्वास होता. पण मुश्रीफ यांनी त्यांना पुन्हा एकदा शह दिला.

निवडणूक निकालानंतर सुरुवातीचे काही महिने घाटगे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. तेव्हा ते पुन्हा भाजपमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली. याच दरम्यान मुश्रीफ यांचे जवळचे मित्र माजी आमदार संजय घाटगे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश केला. एक घाटगे जायच्या आधी दुसऱ्या घाटगेंनी भाजपात जाऊन पुढील विधानसभा निवडणुकीसाठी करिता उमेदवारीचा दावा बळकट केला. त्यावर समरजित घाडगे यांना थांबणे भाग पडले.

राष्ट्रवादी नेतृत्वाची धुरा

गेल्या महिन्यात शरद पवार कोल्हापुरात आले असताना त्यांच्यासोबत घाटगे सावलीसारखे सोबत करताना दिसले. आपण इतरत्र कोठेही जाणार नाही हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पंधरवड्यापूर्वी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घाटगे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची राष्ट्रवादीची रणनीती कशी असावी यावर तडाखेबंद भाषण करीत पक्षाच्या नेतृत्वाची धुरा आपण वाहत असल्याचे दाखवून दिले. आगामी राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच होणार हे त्यांनी अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आठवड्यातील घाटगे यांच्या दोन भेटी या राजकीय चर्चेला कारणीभूत ठरल्या आहेत. पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण याचे काम सुरू आहे. या कामात कागल येथील उड्डाणपूल हा भराव न टाकता खांब उभारून (पिलर) करावा अशी मागणी त्यांनी केली होती. ती मान्य झाल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले. आणखी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही भेटी विकास कामाच्या निमित्ताने असल्या तरी त्यातून पुन्हा एकदा घाटगे यांनी हाती कमळ घेणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गाने जात असताना त्यांचा दुसरा पाय भाजपच्या वाटेवर दिसत असल्याने त्यांच्या एकंदरीत हालचाली या चर्चेला कारणीभूत ठरल्या आहेत.