कावेरी नदीच्या पाण्यावरून दशकांपासून भांडत असलेली राज्ये कर्नाटक आणि तमिळनाडू आता एका नवीन मुद्द्यावरून वादात आहेत. तो मुद्दा म्हणजे भाषा. अभिनेते कमल हासन यांनी कन्नड भाषेचा उगम तमीळ भाषेतूनच झाला आहे, असे वक्तव्य अलीकडेच केले होते. त्यावरून कन्नडवासीयांच्या भावना दुखावल्या आणि राजकीय प्रतिक्रियांची लाटही उसळली. या कारणामुळे इंडिया आघाडीत परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस नेत्यांनी हासन यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे आणि त्यांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकने हासन यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले आहे.

दोन्ही राज्य सरकारांमध्ये थेट वाद नसला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे या प्रदेशातील भाषिक संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. राज्यातील सहयोगी पक्षांमध्येच अशा दोन भूमिका दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हासन यांच्या ठग लाईफ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हा वाद निर्माण झाला होता. मात्र, हासन यांच्या वक्तव्याचा परिणाम आता या चित्रपटावर झाला असून, सध्या कर्नाटकात तो प्रदर्शित होणार नाही. त्यामागे हासन यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे कारण सांगितले जात आहे.

कर्नाटकातील नेत्यांची भूमिका

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हासन यांना बिचारे कमल हासन असे संबोधत म्हटले, “त्यांना कन्नड भाषेचा दीर्घकालीन इतिहास माहीत नाही.” उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार म्हणाले, “दोन्ही राज्ये मित्र आहेत; शत्रू नाहीत. त्यामुळे हा राजकीय मुद्दा होऊ देऊ नये. आपण शेजारी आहोत. आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे आणि एकत्र राहिले पाहिजे. इकडचे पाणी तमिळनाडूला जाते आणि तमिळनाडूचे लोक येथे येतात. मला त्यावर मत द्यायचे नाही. कारण- मला त्या मुद्द्याचा इतिहास माहीत नाही.”
असे असताना कर्नाटकचे मंत्री शिवराज तंगडागी यांनी असे स्पष्ट केले, “अभिनेता हासन यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही, तर कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सने निर्णय घेतल्यानुसार त्यांच्या चित्रपटांवर राज्यात बंदी घातली जाईल.

कर्नाटकचे मंत्री ईश्वरा खांद्रे यांनीही कमल हासन यांच्या विधानाचा निषेध केला आहे. कर्नाटकचे मंत्री संतोष लाड यांनीही असेच मत व्यक्त करताना म्हटले, “त्यांचे मत काहीही असो. आम्हाला आमच्या भूमीबद्दल आणि भाषेबद्दल खूप आदर आहे. मी त्यांचे विधान वाचलेले नाही. मात्र जर त्यांच्या विधानामुळे भाषेबद्दलच्या आमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांचा निषेध करतो.”

द्रमुक नेत्यांचा कमल हासन यांना पाठिंबा

तमिळनाडूचे नगरपालिका प्रशासन, शहरी व पाणीपुवरठा मंत्री के. एन. नेहरू यांनी हासन यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, “हासन यांनी जे म्हटले, ते काही चुकीचे नाही. तेलुगू, मल्याळम या भाषांचा जन्म तमीळ भाषेतून झाला आहे, त्यांनी जे म्हटले ते चुकीचे नाही.” द्रमुकचे प्रवक्ते टी. के. एस. एलांगोवन यांनी म्हटले, “हासन यांनी कन्नडचा अपमान केला नाही आणि भाजपानं फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.”

“जेव्हा भाजपा कोणत्याही मुद्द्याला हात घालते तेव्हा ते काहीही बरळतात. कमल हासन यांनी काही ऐतिहासिक तथ्यं वाचली असतील आणि तीच सांगितली असतील. हा त्यांचा निष्कर्ष नाही. याचा अर्थ असा नाही की, ते कन्नडचा अपमान करीत आहेत. हा कमल हासन यांचा दृष्टिकोन नाही; भाजपाची भूमिका लोकांमध्ये समस्या निर्माण करणेच आहे. त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपा हा लोकांच्या फायद्यासाठीचा पक्ष नाही. कोणीही कन्नडच्या विरोधात नाही. तमिळनाडूमध्ये कन्नड बोलणारे बरेच लोक राहत आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो”, असे एलांगोवन म्हणाले. हासन लवकरच द्रमुकच्या मदतीने राज्यसभेत प्रवेश करणार असल्याचं प्रमुख कारण या पाठिंब्यामागे आहे.

या वादात भाजपा कुठे आहे?

दोन्ही राज्यांमध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्द्यावर काळजीपूर्वक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या नेत्यांनी हासनवर टीका केली असली तरी त्यांनी तमीळ-कन्नड वादावर फारशी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळत सर्व भाषा भारताच्या आहेत, अशी तटस्थ भूमिका घेतली आहे.

तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष नैनार नागेंद्रन म्हणाले, “जर आपण कन्नडची उत्पत्ती तमीळ भाषेतून झाली आहे का याचा शोध घेतला, तर मतभेद होतील; मात्र, शेवटी सर्व भाषा आपल्या आहेत.”
तमिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष नारायणन तिरुपती म्हणाले, “हासन यांनी आपल्या भाषेचे कौतुक करण्यासाठी कोणत्याही भाषेला कमी लेखू नये. कमल हासन यांना कुठून कळले की, कन्नडची उत्पत्ती तमीळ भाषेतून झाली आहे? त्यांच्यासारख्या सेलिब्रिटीने त्यांची सामाजिक प्रतिष्ठा पाहता, अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. त्यांनी हे सर्व कुठून जाणून घेतले हे सांगावे. असे स्पष्ट करणारे कोणतेही कागदपत्र आहे का? ते जे बोलले, त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. कमल हासन यांनी याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.”

भाजपा नेत्या तमिलिसाई सौंदरराजन म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेची समृद्धता सांगता तेव्हा तुम्ही इतर भाषांबद्दलही विचार केला पाहिजे. कमल हासन यांनी कन्नड, तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना हे आधी का नमूद केले नाही? आता ते इतर राज्यांमधील बंधुत्व का बिघडवत आहेत?”

कर्नाटक भाजपाचे प्रमुख विजयेंद्र येडियुरप्पा म्हणाले, “हासन यांनी कन्नड भाषेचा अनादर केला आहे. विशेषतः कलाकारांमध्ये प्रत्येक भाषेचा आदर करण्याची संस्कृती असली पाहिजे”.
केंद्रीय राज्यमंत्री व बंगळुरू उत्तरच्या लोकसभा खासदार शोभा करंदलाजे यांनी हासन यांच्या विधानाचा निषेध केला आणि आरोप केला आहे की, अभिनेते हासन राज्ये आणि त्यांच्या भाषांमध्ये समस्या निर्माण करू पाहत आहेत.

कमल हासन काय म्हणाले?
गेल्या आठवड्यात ‘ठग लाइफ’च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान कमल हासन यांनी असे वक्तव्य केले, “कन्नडचा जन्म तमीळ भाषेतून झाला आहे.” त्यामुळे कन्नडसमर्थक गट आणि सांस्कृतिक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सँडलवूड स्टार शिवा राजकुमार यांना संबोधित करताना हासन यांनी हे विधान केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही माझ्या कर्नाटकातले कुटुंब आहात आणि म्हणूनच तुम्ही येथे आला आहात. जेव्हा मी भाषण सुरू केले, तेव्हा मी म्हणालो की, माझे जीवन आणि माझे कुटुंब तमीळ आहे. तुमची भाषा तमीळमधून जन्माला आली आहे आणि म्हणूनच तुम्ही तिचा भाग आहात”, असे शिव राजकुमार यांना कमल हासन म्हणाले. त्यानंतर हासन यांनी त्यांच्या वक्तव्याचा बचाव करताना म्हटले की, त्यांनी हे प्रेमापोटी म्हटले आहे आणि अनेक इतिहासकारांनी त्यांना भाषांचा इतिहास शिकवला आहे. तमिळनाडू हे असे राज्य आहे, जिथे एक मेनन आमचे मुख्यमंत्री आहेत, जिथे एक रेड्डी आमचे मुख्यमंत्री आहेत, एक तमीळ आमचे मुख्यमंत्री आहेत आणि एक कन्नडिगा अय्यंगार आमचे मुख्यमंत्री आहेत. राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत. माझ्यासह त्यांच्याकडे त्याबद्दल बोलण्याची पात्रता नाही. या सर्व सखोल चर्चा इतिहासकार, पुरातत्त्वशास्त्रज्ञ व भाषातज्ज्ञांवर सोडून देऊ.