Bihar election Eknath Shinde Name Discussion : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपाठोपाठ काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष्य बिहारकडे वळवले आहे. बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने बिहारमध्ये यंदा चुरशीची लढत होणार आहे. यादरम्यान बिहारच्या राजकारणात सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. नेमके काय आहे यामागचे कारण? त्यासंदर्भातील हा आढावा…

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटपाचे सूत्र जाहीर करून निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे. यंदाची निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाणार असल्याचे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण देऊन जनता दल युनायटेडला डिवचले असून, भाजपाला उघडपणे इशारा दिला आहे.

आणखी वाचा : MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या मनसेपासून काँग्रेस का ठेवतेय दुरावा? कारण काय?

नेमके काय म्हणाले कन्हैया कुमार?

“बिहारमध्ये नितीश कुमार यांना ‘पलटू राम’ म्हणून हिणवले जाते. कारण त्यांनी वेळोवेळी आपल्या राजकीय भूमिका बदललेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत राज्यातील मतदार जनता दल युनायटेड पक्षाला कौल देणार नाहीत. नितीश कुमार यांचा शिंदे करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्रात जे घडले त्याची चर्चा बिहारमध्ये सुरू आहे”, असा दावा कन्हैया कुमार यांनी केला आहे. “भाजपाने नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, कारण त्यांना जनता दल युनायटेड पक्षाचे मतदान हवे आहे. एकदा निवडणुकीचे कौल हाती आले तर नितीश कुमार यांना हटवून ते आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करतील, पण भाजपाने महाराष्ट्रामध्ये जे शिंदेंबरोबर केले, तसे बिहारमध्ये करण्याचा प्रयत्न करू नये. बिहारचे मतदार या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवेल”, असेही कन्हैया कुमार म्हणाले.

महाआघाडीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप घोषित केला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल पक्षात रणकंदन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीला सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असणार, असा प्रश्न कन्हैया कुमार यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल. तेजस्वी यादव यांनी अनेकदा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही व्यवस्थित सांभाळली आहे. आता ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास तेच मुख्यमंत्री होतील आणि आमचा कोणताही आक्षेप नसेल”, असे कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

कन्हैया कुमार यांच्या दाव्यावर जेडीयूने काय म्हटले?

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्यानंतर जनता दल युनायडेटचे कार्याध्यक्ष संजय झा यांनीही ‘पंचायत आजतक बिहार’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. आगामी निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजपा आणि जेडीयूमध्ये झालेल्या एका चर्चेचा दाखलाही दिला. “२०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेड पक्षाने ४३ आणि भाजपाने ७४ जागांवर विजय मिळवला. निकालानंतर खुद्द नितीश कुमार यांनी भाजपाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्याचे आवाहन केले होते. आम्ही सरकारमध्ये राहून सहकार्य करू, असे वचनही त्यांनी दिले होते. तरीही भाजपाने नितीश कुमार यांच्या नेतृत्वावरच विश्वास टाकला आणि पाच वर्षे सरकार चालवले. मी आधीही सांगितले आहे की, भाजपाबरोबर सरकार चालवताना नितीशजींना कोणतीही अडचण येत नाही”, असे झा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मोदी सरकारच्या ‘त्या’ विधेयकाला शरद पवारांचा पाठिंबा? सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात नेमके काय घडले होते?

२०२२ मध्ये एकसंध शिवसेना दुभंगल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ मधील विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली. या निवडणुकीत भाजपाने १३२ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला. शिवाय महायुतीतील घटकपक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगले यश मिळाले. निकालानंतर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील हेच पॅटर्न भाजपा आता बिहारमध्येही राबवणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.