कर्नाटक विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता एकीकडे सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे आपल्या सोईच्या मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी नेतेमंडळी वरिष्ठांशी वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्ष त्यांना कोलार या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास अनुकूल नसल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सिद्धारमय्या यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हेही वाचा >>> कृषीमंत्र्यांच्या अंधारातील धावत्या दौऱ्याने शेतकरी नाराज काँग्रेस तिकीट देण्यास अनुकूल नाही मिळालेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र कोलार मतदासंघातील जनमत सिद्धरामय्या यांच्याविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत काँग्रेसने एक सर्व्हेदेखील केला आहे. याच कारणामुळे काँग्रेस पक्ष त्यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यास अनुकूल नाही. परिणामी सिद्धरामय्या यांनीही सावध भूमिका घेतली आहे. कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी याबाबत मी माझी पत्नी आणि मुलगा यतिंद्र यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच कोठून निवडणूक लढवायची हे मी जाहीर करेन असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. हेही वाचा >>> Jammu Kashmir Election : ‘…तर विधानसभा निवडणूक घेतली असती,’ ओमर अब्दुल्लांची भाजपावर टीका पत्नी, मुलाशी चर्चा करूनच कोठून निवडणूक लढवायची हे ठरवणार "माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करूनच मी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे जाहीर करणार आहे. तशी माहिती मी माझ्या समर्थकांना दिलेली आहे. आमूक एका मतदारसंघातून निवडणूक लढवू नका असे मला आमच्या कोणत्याही नेत्याने तसेच हायकमांडनेदेखील अद्याप सांगितलेले नाही. मी माझी पत्नी आणि मुलाशी चर्चा करूनच कोठून निवडणूक लढवायची हे ठरवणार आहे," असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. हेही वाचा >>> ‘…म्हणून भाजपाने राहुल गांधींना हिरो बनवलं,’ ममता बॅनर्जींच्या टीकेला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर; अधीर रंजन चौधरी म्हणाले, “तृणमूल काँग्रेस पक्ष हा…” .तर वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? दरम्यान, सिद्धरामय्या यांना कोलार मतदारसंघासाठी तिकीट न मिळाल्यास ते मैसूर जिल्ह्यातील वरुणा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याआधीच्या निवडणुकीत सिद्धरामय्या यांनी हा मतदारसंघ आपल्या मुलासाठी सोडला होता. सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र हे वरुणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सिद्धरामय्या मुलाला बाजूला सारून स्वत: निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आगामी काळात ते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.