विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाच्या विद्यमान सहा आमदारांना डावलण्यात आले आहे. म्हणजेच या सहा आमदारांना भाजपाने तिकीट दिलेले नाही. याच कारणामुळे भाजपामधील असंतोष बाहेर पडला आहे. डावलण्यात आलेले विद्यमान आमदार तसेच नेते बंडाची, निवृत्तीची आणि भाजपाचे घोटाळे बाहेर काढण्याची भाषा करत आहे. परिणामी येथील बंडाळी थोपवण्याचे भाजपासमोर आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसवराज बोम्मई यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार

तिकीट नाकारल्यानंतर भाजपाचे आमदार नेहर ओलेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारी निधी मुलाच्या खात्यात वळवल्याप्रकरणी ते दोन वर्षे तुरुंगात होते. त्यांनी मी लवकरच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा थेट इशारा दिला आहे. “बसवराज बोम्मई यांनी भ्रष्टाचार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. येणाऱ्या काळात हा भ्रष्टाचार मी समोर आणणार आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आम्ही दबाव टाकू,” असे ओलेकर म्हणाले आहेत.

हेही वाचा >> Karnataka : ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापले; भाजपा नेते म्हणाले, “उमेदवार कुणीही असो, पक्षाचे चिन्ह अन् मोदींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास”

ओलेकरांचे सर्व आरोप बोम्मई यांनी फेटाळले आहेत. “ओलेकर यांना आरोप करू द्या. त्यांनी हेच आरोप कागदपत्रे सोबत घेऊन करावेत. याबाबतची चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल,” असे बोम्मई म्हणाले.

येडियुरप्पा नसतील तर भाजपाच्या मागे लोक उभे राहणार नाहीत

तीन वेळा आमदार झालेले एमपी कुमारस्वामी यांनादेखील या वेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “मी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच मी आमदारकीचाही राजीनामा देणार आहे,” असे कुमारस्वामी म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांना दोष दिला आहे. “सीटी रवी यांच्यामुळेच मला आमदारकीचे तिकीट मिळालेले नाही. येडियुरप्पा नसतील तर भाजपाच्या मागे लोक उभे राहणार नाहीत. त्यांनी आपला मोबाइल आठवडाभरासाठी बंद करून ठेवल्यास भाजपाचा ५० जागांवरही विजय होणार नाही,” असे कुमारस्वामी म्हणाले आहेत.

एकूण १४ आमदारांचे तिकीट कापले

बायंदूर मतदारसंघाचे आमदार सुकुमार शेट्टी, चन्नागिरी मतदारसंघाचे आमदार मडाल विरूपाक्षा, कालघाटगी मतदरसंघाचे विद्यमान आमदार सीएम निंबान्नवार, मायाकोंडा मतदारसंघाचे आमदार लिंगाना यांनादेखील भाजपाने या वेळी तिकीट नाकारले आहे. भाजपाने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या दोन याद्यांमध्ये भाजपाने एकूण १४ विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही.

हेही वाचा >> अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग ; भाजप व ठाकरे गटात संघर्ष

बंगळुरू येथील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने

भाजपामधील नाराजीचे पडसाद भाजपाच्या बंगळुरू येथील कार्यालयातही उमटले. भाजपाने चामराजपेट मतदारसंघातून आयपीएस अधिकारी भास्कर राव यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी सुनिल कुमार उर्फ सायलेंट सुनील उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे सुनील यांच्या कार्यकर्त्यांनी बंगळुरू येथील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत बोलताना सुनील यांनी भाजपा पक्षात प्रवेश केलेला नाही, असे कारण भाजपाने दिले आहे.

तिकीट मिळावे यासाठी वरिष्ठांची भेट

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी, भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर, मला पक्षाने तिकीट दिले नसले तरी मी निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. शेट्टर सध्या हुबळी-धारवाड मतदारसंघाचे आमदार आहेत. या जागेसाठी उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे तिकीट मिळाविण्यासाठी ते वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे.

मला दिलेल्या वागणुकीमुळे मी दु:खी

उडुपी मतदारसंघातून ती वेळा आमदार झालेले रघुपती भट यांनादेखील या वेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. भट यांच्याऐवजी यशपाल सुवर्णा यांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्याबाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मला दु:ख झालेले नाही. मात्र पक्षाने मला दिलेल्या वागणुकीमुळे मी दु:खी आहे. मला तिकीट का नाकारण्यात आले, याबाबत मला अद्याप कोणत्याही नेत्याने सांगितलेले नाही. कोणाचाही मला अद्याप फोन कॉल आलेला नाही,” अशा भावना भट यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >> काही मुख्यमंत्री करोडपती तर काही लखपती; जाणून घ्या एकाच क्लिकवर संपूर्ण यादी

ईश्वरप्पा राजकारणातून निवृत्त

भाजपाचे नेते ईश्वरप्पा यांनादेखील या वेळी तिकीट देण्यात आलेले नाही. मात्र ईश्वरप्पा यांचे पुत्र केई कांतेश शिमोगा मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. कांतेश यांनी गुरुवारी बड्या भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ईश्वरप्पा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे.

कोणतेही पक्षविरोधी काम करणार नाही

सहा वेळा आमदार झालेले एस अंगारा यांनीदेखील पक्षाने तिकीट न दिल्यामुळे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. “मी दु:खी नाही. मात्र मी पक्षासाठी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम केले, अशी माझी भावना आहे. मी कोणतेही पक्षविरोधी काम करणार नाही. यासह मी कोणत्याही राजकीय कार्यक्रमांमध्येही सक्रियपणे सहभाग नोंदवणार नाही,” असे अंगारा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>अरविंद केजरीवाल राजकारणातले ‘नटवरलाल’, भ्रष्ट लालूप्रसाद यादव, राहुल गांधींवर भाजपा नेत्याची टीका

दरम्यान, भाजपामधील हा असंतोष पक्ष कसा हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते लवकरच नाराज नेत्यांशी संवाद साधणार आहेत, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka election 2023 bjp 14 mla ticket denied activist protest prd
First published on: 13-04-2023 at 19:11 IST